आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांना छोटू सिलिंडरवरही पूर्ण विमा मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या जागी ५ किलोचे छोटू सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांनाही दुर्घटना घडल्यास मोठ्या सिलिंडरमुळे होणाऱ्या दुर्घटनेत मिळते तेवढीच विमा रक्कम मिळेल. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, अनेक लोकांना त्याबाबत निश्चित माहिती नाही. सरकारने ग्रामीण भागात बीपीएल कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी उज्ज्वला योजना सुरू केली आहे. मात्र, छोटू सिलिंडर घेतले तर सिलिंडरच्या गळतीमुळे होणाऱ्या अपघातात मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळेल की नाही, अशी शंका लोकांना वाटत आहे. सिलिंडर दुर्घटनेत मृत्यू झाल्यास आता ५ लाखांऐवजी ६ लाख रुपये मिळतील. घरातील नुकसानाची रक्कम एक लाखावरून वाढवून दोन लाख रुपये करण्यात आली आहे. जखमींच्या उपचारासाठी मिळणारी रक्कमही आधीपेक्षा दुप्पट करण्यात आली आहे. सरकार आतापर्यंत छोटे सिलिंडर देतच नव्हते. त्यामुळे कुठलाही लेखी नियमच नव्हता.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, उज्ज्वला योजनेत सर्व ग्राहकांना इन्शुरन्स बाँड दिला जात आहे. भरपाईची रक्कम घेण्यासाठी मुदत निश्चित केली जात आहे. त्यासाठी एक मोठी प्रक्रिया आहे. एक मेपासून सुरू झालेल्या या योजनेत शनिवारपर्यंत २७ लाख कनेक्शन जारी करण्यात आले आहेत. पहिल्या स्थानी उत्तर प्रदेश आहे. तेथे १२.५ लाख बीपीएल कुटुंबांना कनेक्शन दिले आहेत. सध्या देशात सुमारे १७.६ कोटी एलपीजी ग्राहक आहेत. पुढील तीन वर्षांत ते दुप्पट व्हावेत, अशी सरकारची इच्छा आहे.
बातम्या आणखी आहेत...