नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास त्यांच्याच पक्षाच्या एका महिलेसोबतच्या कथित अनैतिक संबंधामुळे अडचणीत आले आहेत. या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाने त्यांना हजर राहाण्यास सांगितले असून सलग दुसऱ्या दिवशी ते गैरहजर राहिले आहेत. आता महिला आयोगाने या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून या प्रकणात लक्ष देण्याचे अपील केले आहे. दरम्यान, अशी माहिती आहे, की विश्वास एका कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेले आहेत.
काय आहे पत्रात
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह यांनी राजनाथसिंह यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की वारंवार बोलावूनही कुमार विश्वास आयोगासमोर हजर झालेले नाहीत. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी आयोगाने पाचारण केले होते, पण त्यांनी आयोगाची विनंती धुडकावून लावली आहे. आयोग दोन दिवसांपासून त्यांची वाट पाहात आहे. कारण या प्रकरणात पीडित महिलेने
आप नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे, की त्यांनी यात दखल द्यावी.
मदतीची याचना करत महिलेचा पतीही पोहोचला आयोगाकडे
बुधवारी दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयात पीडित महिलेचा पती हजर झाला. त्याने सांगितले, मला माझ्या पत्नीबद्दल शंका नाही, पण इतर लोक तिच्यावर वाइट कॉमेंट्स करत आहेत. ते म्हणाले, जोपर्यंत कुमार विश्वास सार्वजनिकरित्या सांगत नाही, की त्यांचे माझ्या पत्नीशी कोणतेही संबंध नाही, तो पर्यंत मी तिचा स्विकार करणार नाही.
कुमार विश्वास यांच्यावर काय आहे आरोप
आपची महिला कार्यकर्ती गेल्या लोकसभा निवडणुकीत कुमार विश्वास यांच्यासोबत निवडणूक प्रचारासाठी अमेठीला गेली होती. कुमार विश्वास यांच्या पत्नीने आरोप केला आहे, की तिने विश्वास आणि 'त्या' महिलेला तिथे आक्षेपार्ह्य आवस्थेत पाहिले होते. हे प्रकरण उघड झाल्यापासून महिलेच्या पतीने तिला घराबाहेर काढले आहे. त्यानंतर पीडित महिलेने दिल्ली महिला आयोगाचे दार ठोठावत कुमार विश्वास यांनी सार्वजनिकरित्या यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे, मात्र विश्वास समोर यायला तयार नाहीत.