आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीस देशांसाठी आगमन होताच मिळणार भारतात व्हिसा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगमनावेळी तत्काळ व्हिसा देण्याची सुविधा 40 नव्या देशांच्या नागरिकांना लवकरच मिळणार आहे. या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीचा समावेश आहे. योजना आयोगाने 5 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात येईल.
40 देशांच्या पर्यटकांच्या अरायव्हल व्हिसाचा प्रस्ताव गृह मंत्रालयाच्या मंजुरीविना अनेक दिवसांपासून रखडला आहे. व्हिसा सुविधेच्या कक्षावाढीला मंजुरी मिळवण्यासाठी गृह मंत्रालयाकडे याआधीच अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. संबंधित प्रस्तावाला अन्य मंत्रालय आणि खात्याशिवाय पर्यटन, परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सहमती दर्शवली आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात नियोजन आयोगाने बोलावलेल्या बैठकीत आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया, परराष्ट्र सचिव परवेझ देवाण, गुप्तचर संस्था आणि पंतप्रधान कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ऑक्टोबर महिन्यात उपस्थित झालेल्या मुद्दय़ांवर आगामी बैठकीत निर्णय घेतला जाईल. योजना विभागाचे मंत्री राजीव शुक्ला यांनी व्हिसा प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली आहे. यानंतर गृह मंत्रालयाची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. परराष्ट्र, पर्यटन मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयाने मंजुरी दिलेली आहे.
सौदी अरेबिया, फ्रान्स, इटलीचा समावेश
ज्या देशांना ही सुविधा देण्यात येणार आहे, त्यामध्ये कॅनडा, ब्राझील, यूएई, सौदी अरेबिया, फ्रान्स, इटली, स्वीडन, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, पोलंड, नॉर्वे आणि आयर्लंडचा समावेश आहे. व्हिसा ऑन अरायव्हल प्रणालीअंतर्गत भारताचा जपान, फिनलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, लक्झेंबर्ग, न्यूझीलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपाइन्स, लाओस आणि म्यानमार या देशांशी करार आहे. याशिवाय नियोजन आयोग पर्यटनास अनुकूल वातावरण तयार करण्यावर भर देत आहे. त्यासाठी विदेशी ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्याची योजना आहे.