आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पासपोर्टचे ‘विमान’ जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीबाहेर राहणा-या व्यक्तीला पासपोर्ट (पारपत्र) हवा असेल, तर त्यासाठी आता प्रादेशिक पारपत्र कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. अर्ज केल्यानंतर त्यांना स्वत:च्या किंवा शेजारच्या जिल्ह्यात मुलाखत देण्याची सोय होणार आहे. याच आधारावर त्यांना पासपोर्ट दिला जाईल. ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या योजनेची सुरुवात उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादपासून 14-15 डिसेंबर रोजी होणार आहे. या वेळी आसपासच्या सहा जिल्ह्यांतील अर्जदारांना बोलावण्यात येईल. फर्रुखाबाद परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. पुढील टप्प्यात मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि महाराष्‍ट्रात योजनेची अंमलबजावणी होईल. यानंतर देशाच्या अन्य भागात योजना लागू होईल. विशेष म्हणजे या सुविधेसाठी अर्जदारांकडून कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही.
सध्याची प्रक्रिया : पासपोर्ट प्राप्त करणे किंवा त्याच्या नूतनीकरणासाठी ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. यानंतर अर्जदाराला सर्व कागदपत्रे घेऊन प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. राज्यांमध्ये प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये राजधानी किंवा काही निवडक शहरांत आहेत.
नवी प्रक्रिया : ‘पासपोर्ट आपल्या दारी’ योजनेअंतर्गत परराष्‍ट्र मंत्रालय पासपोर्ट मेळाव्याचे आयोजन करेल. यामध्ये अर्जदाराचे छायाचित्र काढण्यापासून बोटांचे ठसे घेण्याची मशीन उपलब्ध केली जाईल. मुलाखतीची वेळ, तारीख मेलवरून कळवली जाईल. या दिवशी त्यांना पासपोर्टच्या अधिका-यांसमोर हजर राहावे लागेल. यानंतर पासपोर्ट टपालाने पाठवून दिले जाईल.
पुढील टप्पा पासपोर्ट सेवा व्हॅन : परराष्‍ट्र मंत्रालय पासपोर्ट सेवा व्हॅन योजनेचीही तयारी करत आहे. यासाठी विशेष वाहन तयार केले जात आहे. यामध्ये सर्व मशीन्स असतील. पासपोर्ट अधिकारी या गाड्यांतून विविध जिल्ह्यांचा दौरा करतील. कागदपत्रांच्या पडताळणीसोबत अन्य प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर इथे पासपोर्ट मेळावा घेण्याची आवश्यकता भासणार नाही.