आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांसाठी आज सांस्कृतिक मेजवानी, राष्ट्रपती भवनात पाहुण्यांसाठी शास्त्रीय नृत्य-संगीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/चेन्नई/वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौ-याला रविवारपासून सुरुवात होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ओबामा दांपत्यासाठी भारतीय शास्त्रीय नृत्य-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ओबामा दांपत्याला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडेल.

रविवारपासून तीन दिवस ओबामा भारत भेटीवर येतील. सेहर नावाच्या एनजीओने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. २०१० मध्ये ओबामा भारत भेटीवर आले होते त्या वेळीदेखील अशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतात दिसणा-या भाषिक, धार्मिक विविधतेमधील एकता कार्यक्रमातून दिसून येईल, असे सेहर संस्थेचे संचालक संजीव भार्गव यांनी सांगितले. नृत्य कलावंत ऋग्वेदामधील ऋचा लयबद्धपणे विविध प्रकारांत सादर करणार आहेत. त्यात कथ्थक, मणिपुरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थकली असे नृत्य प्रकार असतील. माधवी मुद्गल यांनी त्यासाठी कलावंतांना मार्गदर्शन केले आहे.

डाव्या पक्षांची निदर्शने
भारताला भेट देण्यासाठी येणारे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना विरोध करण्यासाठी माकप आणि भाकपच्या वतीने शनिवारी येथे निदर्शने करण्यात आली. अमेरिकी उद्योग जगताला फायदा मिळावा, हाच ओबामा यांच्या भेटीमागील उद्देश आहे. ओबामांच्या भेटीमुळे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती माकपचे आमदार ए. सुंदरराजन यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ओबामा यांच्या दौ-याला विरोध करणारी घोषणाबाजीही केली.

अल्पसंख्याकांचा मुद्दा उपस्थित करावा
बराक ओबामा यांनी भारत भेटीवर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अल्पसंख्याकांचा मुद्दा उपस्थित करावा, अशी मागणी भारतीय-अमेरिकी मुस्लिम संघटनेने केली आहे. भारतात ख्रिश्चन, शीख, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समुदायाची स्थिती बिकट आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडूनही चिंता व्यक्त झाली आहे.