नवी दिल्ली - जेईई मेन २०१५ मध्ये यशस्वी आेबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींना जात प्रमाणपत्र सादर करण्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी यासंदर्भात संबंधित अधिका-यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. तूर्तास यातून मार्ग काढण्याची तयारी इराणींनी दर्शवली.
जेईई मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी आयआयटी अॅडव्हान्स परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करत आहेत. आेबीसी विद्यार्थ्यांना अर्जासोबत जात प्रमाणपत्रही सादर करायचे आहे. मात्र यासाठी १ जून २०१४ नंतर तयार केलेले प्रमाणपत्रच वैध मानण्यात येतील. त्यामुळे त्या पूर्वीचे प्रमाणपत्र असणा-यांना अर्ज भरण्यात अडथळा निर्माण झाला आहे. संसद सदस्य अली अनवर अन्सारी यांनी हा प्रकार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. या परीक्षेसाठी गाव व छोट्या शहरांतील बरेच विद्यार्थी अर्ज करतात. अर्ज भरण्यासाठी २ ते ७ मे पर्यंतची मुदत दिली आहे. इतक्या कमी वेळात नवे प्रमाणपत्र मिळणे अशक्य असल्याचे अन्सारींनी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले.