आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखूवर भाजप खासदार म्हणाले... रोज ६० सिगारेट ओढूनही ना कर्करोग होतो, ना मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तंबाखूच्या वापराची पाठराखण करताना भाजपच्या आणखी एका खासदाराने बेताल वक्तव्य केले. सिगारेट ओढण्याने कॅन्सर झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावा रामप्रसाद शर्मा यांनी केला आहे. ते म्हणाले, "रोज ६० सिगारेट ओढूनही ठणठणीत राहिले.
वयाच्या ८६ व्या वर्षी निवर्तले. अशा एका ज्येष्ठास मी ओळखतो. आजही रोज ४० सिगारेट ओढणारे वयाच्या पंचाहत्तरीत आहेत. निरोगी आहेत. काही कॅन्सर झालेला नाही.'
शर्मा यांच्यापूर्वी भाजप खासदार दिलीप गांधी व श्यामचरण गुप्तांनीही तंबाखूच्या वापराची पाठराखण केली आहे. तंबाखूचा वापर रोखण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीचे हे खासदार सदस्य आहेत.
दिलीप गांधी तर अध्यक्ष आहेत. आधी त्यांनीच सिगारेटमुळे कॅन्सर होतो, असे सांगणारा अभ्यास भारतात झाला नसल्याचे म्हटले होते. तंबाखूमुळे पचन चांगले होते, असे ते म्हणाले. साखरेमुळे मधुमेह होतो, मग त्यावरही बंदी घालावी का, असा सवाल श्यामचरण गुप्ता यांनी केला होता. यावर माजी आरोग्यमंत्री रामदोस म्हणाले, जग हसत आहे. पाकिटावर ८५ % जागेत इशारा छापावा.

समितीच्या १५ सदस्यांना भास्कर समूहाचा फोन; 3 बाजूने,६ विरोधात, ५ फोन बंद, १ गप्प
तंबाखूने कर्करोग होत नाही, असे म्हणणे चुकीचे आम्ही तंबाखूच्या विरोधात आहोत. त्याने कर्करोग होतो. ज्यांचा हा व्यवसाय आहे त्यांना समितीत घेणे चूकच. त्यामुळे असे विधान होतच राहणार.- अली इद्रिस, खासदार, तृणमूल
तंबाखू हानीकारक असून मी त्याच्याविरोधात आहे

तंबाखूला विरोध व्हायलाच हवा. इशारा चित्र ८५ टक्के करावे की नाही, हा प्रश्न आहे. माझ्या मते चित्र मोठे असावे, परंतु जास्तही मोठे नकोे. सीआर चौधरी, खासदार, भाजप
इशारा चित्राचा आकार नक्कीच वाढायला हवा

तंबाखूने कर्करोग होतो. त्यासाठी इशारा चित्राचा आकार वाढवा, पण सामाजिक तथ्येही विचारात घ्यावीत. पूर्ण चर्चा न झाल्याने निर्णय टळला होता.-पी.पी.चौधरी, खासदार, भाजप
तंबाखूमुळे कर्करोग होतो, असे समितीने म्हटले नाही

तंबाखूने कर्करोग होत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र, परदेशी कंपन्यांना सवलत कशासाठी? त्यांच्या पाकिटांवरही इशारा चित्रे छापा. -रामकुमार शर्मा, आरएसएलपी
तंबाखूच्या विरोधातच, विडी कामगारांच्या नाही

तंबाखू हानीकारक आहे, हे वेगळे सांगायला नको. मात्र, सर्वांनाच कर्करोग होते, असे म्हणणे चूकच. विडी कामगारांचाही विचार व्हावा.- वीरेंद्रकुमार चौधरी, भाजप
मी बैठकीतही विरोध केला, बाहेरही करणार

माझा तंबाखूला विरोध आहे. त्याचे परिणाम युवकांनी लक्षात घ्यावेत. मी बैठकीतही या बाबीला िवरोध केला होता आणि बाहेरसुद्धा करणार.-चंदूलाल साहू, खासदार, भाजप
पाच खासदारांनी फोन बंद ठेवले
एस.पी.मुद्दाहनुमगौडा, झीना हिकाका, प्रेमदास राय, नंदी येलेय्या, नरेंद्र सवाईकर यांचे फाेन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
बाजू घेणारे विडी उद्योगपती
तंबाखूची बाजू घेणाऱ्या दिलीप गांधी, श्यामचरण गुप्ता व रामप्रसाद वर्मा यांच्यातील गुप्ता व गांधी हे विडी व्यावसायिक आहेत.
मोदी मात्र अद्याप अहवालच मागत आहेत
तंबाखूचे वादंग भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पोहोचले. सूत्रांच्या मते, मध्यंतरात पंतप्रधान मोदींनी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डांशी चर्चा केली. नड्डांनी तेथेच प्रेझेंटेशन दिले. मोदींनी संबंधितांची बैठक घेण्याचे निर्देश दिले आणि सात दिवसांत अहवाल मागितला.
खरे कोण? तुम्ही की दररोजचे मृत्यू?

विषारी पानांची बाजू का घेतली जात आहे? तंबाखूमुळे कर्करोग होत नाही, असा खोटा तर्क का दिला जातो? आपले म्हणणे खरे असेल तर ‘तंबाखूजन्य पदार्थांनी होणाऱ्या रोगांमुळे भारतात दरवर्षी १० लाख जणांचा मृत्यू होतो,’ हे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे खोटे आहे का? तंबाखूचे व्यसन असलेले आर. आर. पाटील, सुनीता तोमर यांचा मृत्यू खोटा आहे का? गुटख्यावर बंदी घालणारी २८ राज्ये चुकीची आहेत का? बंदी योग्य ठरवणारे सर्वोच्च न्यायालय चूक आहे का? आश्चर्य वाटते. जग हसत आहे.
आम्हाला नव्हे, स्वत:लाच. तुम्हाला १० हजार कोटींच्या तंबाखू उद्योगाची चिंता असेल, पण आम्हाला उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्यांची चिंता आहे. तंबाखूमुळेही येत नसावा एवढा कडवट वास ही वक्तव्ये आणि पंतप्रधान-आरोग्यमंत्र्यांच्या चुप्पीमुळे येत आहे. हे समितीचे विचार आहेत असे म्हणून सरकार बचाव करू शकत नाही. तर्कहीन युक्तिवाद करणारे भाजपचे खासदार आहेत. एकतर त्यांना गप्प करा किंवा त्यांच्याशी सरकार सहमत आहे, असे तरी सांगा. म्हणजे डोळ्यावरील ‘अच्छे दिन’ची पट्टी आम्हाला काढता तरी येईल.