नवी दिल्ली - उंच उंच इमारतींनी घेरलेल्या द्वारकेत एक दोन बेडरूमचा फ्लॅट आहे. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर विश्वास नसावा की काय अशा पद्धतीने बसवलेले लोखंडी गेट दृष्टीस पडते. याच घरातील मुलगी गेल्या वर्षी 16 डिसेंबर रोजी दिल्लीत महाभयंकर प्रकरणात बळी पडली होती. या घटनेने तिला निर्भया हे नवे नाव मिळाले. त्या वेळी पाच जणांचे हे कुटुंब द्वारकानजीकच्या महावीर एन्क्लेव्ह परिसरातील झोपडपट्टीत एका खोलीत राहत होते. गेल्या वर्षभरात त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला हे जाणून घेण्यासाठी ‘भास्कर’ने कुटुंबाची भेट घेतली.
संपूर्ण देश हादरवून टाकणा-या आंदोलनानंतर सरकारही जागे झाले आणि त्यांनी निर्भयाच्या नावावर कायदा बनवला. वडिलांना नुकसानभरपाई दिली तसेच हा दोन रूमचा फ्लॅट. यासोबत त्यांना चांगली नोकरीही. याआधी ते इंदिरा गांधी विमानतळावर लोडर होते, आता त्यांना गेटवर एंट्री तिकीट विक्री करण्याचे काम मिळाले आहे.ड्रॉइंग रूममध्ये केवळ चार प्लास्टिकच्या खुर्च्या, एक छोटा टेबल आणि एक दिवाण. खुर्च्या आणि दिवाण पाहिल्यानंतर जुन्या घराची आठवण होते. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर वडील याच दिवाणवर शांत बसून राहत होते. सांत्वनासाठी आलेले लोक याच खुर्च्यांवर बसत होते.
लहान भावाने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला असून तो कॉलेजच्या वसतिगृहात राहत आहे. दुसरा भाऊ घरी राहून अभ्यास करत आहे. आता आई-वडिलांची जबाबदारी त्याच्यावरच आहे. घराची एक खोली त्याची, तर दुस-या खोलीत आई-वडील राहत आहेत. गेल्या वर्षी त्यांचा प्रत्येक दिवस गर्दीत जात होता. दररोज प्रसारमाध्यमे, वकील, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या सतत संपर्कात राहिले. मात्र, एवढे व्यग्र असूनही त्यांचा एकटेपणा भरून निघाला नाही. घरच्यांना निर्भयाची आठवण होत नाही, असा एकही क्षण जात नाही. वातावरण गंभीर आहे. प्रयत्न करूनही माझ्या तोंडून शब्द फुटत नाहीत.
नुकताच कॉलेजमधून आलेला अकरावीत शिकणारा लहान भाऊ वातावरण हलके करण्याचा प्रयत्न करतो. आईची तब्येत बरी नसते त्यामुळे तो घरकामात मदत करतो. निर्भया ज्या-ज्या वेळी घरी येत असे तेव्हा आईला कुठल्याच कामाला हात लावू देत नव्हती. मी आलेय ना, निदान दोन दिवस तरी विश्रांती घे, असे ती म्हणत असे. भाऊ टेबलावर चहा ठेवून निघून गेला. चहाकडे पाहताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शालीने डोळे टिपून ती काहीतरी पुटपुटत होती. तिच्या अखेरच्या दिवसांतील प्रत्येक क्षण डोळ्यासमोर तरळतात. आई, मला मरायचे नाही गं- ते कोण आहेत मला माहीत आहे, त्या नराधमांना मला शिक्षा द्यायची आहे, असे तिचे शब्द होते.
वडिलांच्या डोळ्यात भले अश्रू दिसत नसतील, मात्र तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. मुलगा शाळेत गेल्यानंतर न जेवताच दोघे बाहेर पडले होते. अल्पवयीन ठरवलेल्या नराधमाला शिक्षा व्हावी यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्याने जे घाणेरडे कृत्य केले आहे ते कुठला अल्पवयीन करू शकत नाही. माझ्या मुलीच्या आत्म्याला ते त्रास देत आहेत- निर्भयाचे वडील मन मोकळे करत होते. यादरम्यान त्यांचे लक्ष भिंतीवर लटकवलेला स्त्री शक्ती पुरस्कार आणि राणी लक्ष्मीबाई स्पिरिट ऑफ निर्भयाच्या प्रमाणपत्राकडे वळते.
बाजूच्या खोलीत एक रायटिंग टेबल, एक लाकडी खुर्ची, स्टूल आणि बेड आहे. ही भावी खोली आहे. दुस-या बेडरूममध्ये लोखंडी कपाट आणि डबलबेड आहे. ही आई-वडिलांची खोली आहे. एका कोप-यात छोटेसे देवघर आहे. येथे देव-देवतांसोबत निर्भयाचीही तसबीर आहे. नव्या घरातील एक जुनी पेटी लक्ष आकर्षून घेते. यामध्ये निर्भयाचे सर्व साहित्य आहे. वर्षभरापासून आम्ही ती उघडली नाही.मात्र तिच्या आठवणी पेटीत बंद होऊ शकत नाहीत, असे वडिलांनी सांगितले.मुलीला शिकवण्यासाठी गावाकडची शेती गहाण ठेवली होती. बाबा काळजी करू नका, दोघा भावांना मी शिकवेन असे ती मला म्हणाली होती. डेहराडूनहून आल्यानंतर ती नेहमी म्हणायची, काळजी कशाची करता आता? तुमची मुलगी डॉक्टर झाली आहे. हे सांगताना ते वर पाहत म्हणाले, कदाचित ती वरे उपचार करत असावी.
त्या दिवशी साडेतीन वाजता घराबाहेर पडण्याअगोदर निर्भयाने मला चहा बनवून दिला होता. त्यानंतर मित्राकडून पुस्तक आणायचे असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली होती. दोन-तीन तासांत परत येईन, असे म्हणाली होती. तेव्हापासून जेव्हा जेव्हा चहा बनतो, तिचाच चेहरा डोळ्यासमोर येतो.
- हे सांगताना निर्भयाच्या आईच्या डोळ्यांत अश्रू तरळतात.