नवी दिल्ली - इंटरनेटद्वारे रेल्वे आरक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आली असून यात भाग्यवान प्रवाशांना लॅपटॉप, स्मार्ट फोन किंवा दिल्ली-वैष्णोदेवी यात्रा करण्याची संधी मिळेल. आयआरसीटीसीने ही माहिती दिली. सोमवारी मध्यरात्रीपासून पुढील रविवारच्या मध्यरात्रीपर्यंत इंटरनेटवर तिकीट आरक्षित करणा-यांतून संगणकाद्वारे अशा चार भाग्यवान प्रवाशांचा ड्रॉ काढला जाईल.
पहिल्या क्रमांकाच्या प्रवाशाला एक लॅपटॉप तर दुस-या व तिस-या क्रमांकाच्या ड्रॉमध्ये विजेता ठरलेल्या प्रवाशांना स्मार्ट फोन दिले जातील. चौथ्या क्रमांकाच्या भाग्यवान विजेत्याला वैष्णोदेवीची मोफत यात्रा करण्याचे भाग्य लाभणार आहे. प्रवासाचे हे पॅकेज फक्त एका व्यक्तीसाठीच असणार आहे. एखाद्या सोमवारी सरकारी सुटी असेल तर हे ड्रॉ मंगळवारी काढले जातील. या लकी ड्रॉ योजनेची सविस्तर माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. संबंधितांना त्यांनी मिळवलेली बक्षिसे घरपोच दिली जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे आरक्षण करताना संपूर्ण निवासी पत्ता द्यावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.