आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुलने SPG सुरक्षेस दिला होता नकार, PMO ला माहित होते लोकशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 56 दिवसांच्या विश्रांतीनंतर दिल्लीत परतलेले राहुल गांधी एवढे दिवस कुठे होते, याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) होती. पीएमओला एसपीजीकडून दैनंदिन माहिती पुरवली जात होती. राहुल गांधींचे लोकेशन काय आहे हे फक्त पीएमओलाच माहित होते. एवढेच नाही तर, राहुल गांधी निर्धारित शेड्युलच्या 24 तास आधी बँकॉकहून दिल्लीला येत असल्याचेही एसपीजीने पीएमओला कळवले होते. गृहमंत्रालयाच्या सूत्रांच्या माहतीनुसार, राहुल गांधी यांच्या लोकशनबद्दल गृहमंत्री राजनाथसिंह देखील अनभिज्ञ होते.
एसपीजी सुरक्षेला दिला होता नकार
थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी एसपीजी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. वास्तविक एसपीजी त्यांच्यावर नजर ठेवून होती. एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, दिल्ली सोडतानाच राहुल गांधींनी एसपीजी सुरक्षा नको असल्याचे म्हटले होते. फेब्रुवारीमध्येच त्यांनी एसपीजी सुरक्षेशिवाय प्रवासाची परवानगी मागितली होती, आणि केंद्र सरकारने ती मान्य केली होती.
काय आहे एसपीजी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे (एसपीजी) सुरक्षा कवच असते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर गांधी कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधान झालेले राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. त्यानंतर माजी पंतप्रधानांच्या कुटुंबियांनाही एसपीजी सुरक्षा देण्याचा कायदा करण्यात आला होता. त्यानुसार सोनिया गांधी आणि त्यांची मुले राहुल व प्रियंका यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आलेली आहे.
आईची घेतली भेट, भू-संपादनावर केली चर्चा
प्रदीर्घ सुटीनंतर भारतात परतल्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी आई आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची 10, जनपथ येथे जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये भू-संपादन विधेयकावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवारी शेतकऱ्यांची भेट घेणार, 19 एप्रिल रोजी रॅली
भू-संपादन विधेयकातील दुरुस्तीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी शनिवारी शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. 19 एप्रिल रोजी भू-संपादन विधेयकाविरोधात प्रचंड रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी सभेला संबोधित करतील. या रॅलीसाठी राजस्थान आणि हरियाणातून मोठ्या प्रमाणात शेतकरी येणार आहेत.