आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आॅपरेशन जिंजर 2011: 45 मिनिटांत 10 पाक जवान ठार; तिघांचे शिरही आणले होते कापून!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानी सैनिकांनी जुलै २०११ मध्ये सहा भारतीय जवानांना ठार केले होते. दोन जवानांचे तर शिरही कापून नेले होते. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने दोन महिन्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आपल्या इतिहासातील सर्वात घातक सर्जिकल स्ट्राइक केला. या कारवाईत किमान १० पाकिस्तानी सैनिक ठार मारले गेले. कठोर संदेश देण्यासाठी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या तीन सैनिकांचे शिरही कापून सोबत आणले होते. ‘ऑपरेशन जिंजर’ या नावाने झालेल्या या कारवाईचे वृत्त रविवारी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले. २०११ मध्ये लष्कराने अशी कारवाई केल्याचे फेटाळले होते. त्यावेळी कुपवाडा येथील २८ डिव्हिजनचे प्रमुख राहिलेले मेजर जनरल (निवृत्त) ए. के. चक्रवर्ती यांनी ऑपरेशन जिंजरला दुजोरा दिला आहे.

सर्जिकल स्ट्राइकमध्ये ‘लष्कर’चे २० अतिरेकी ठार
भारतीय लष्कराने २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये लष्कर-ए-तोयबाचे २० दहशतवादी ठार झाले. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या विविध गटांतील संभाषणांचे काही रेडिओ इंटरसेप्ट्स पकडले असून त्यातील संवादांतून ही बाब समोर आली आहे. दुदनियाल लाँच पॅडवर केलेल्या हल्ल्यात हे दहशतवादी ठार झाले.
दोघांचे शिर कापून नेल्याने जवान संतप्त
पाकिस्तान बॉर्डर अॅक्शन टीमने (बीएटी) कुपवाडात गुगलधरमध्ये राजपूत आणि कुमाऊं रेजिमेंटच्या सहा सैनिकांवर हल्ला केला. त्यांनी भारतीय लष्कराचे हवालदार जयपालसिंह अधिकारी आणि लान्स नायक देवेंद्र सिंह यांचे शिर कापले आणि ‘ट्रॉफी’ म्हणून ते दोन्ही शिर सोबत नेले. हल्ल्यात जखमी झालेल्या १९ राजपूत रेजिमेंटच्या एका जवानाचा नंतर मृत्यू झाला. सैनिकांचे शिर कापल्यानंतर काही दिवसांनीच घुसखोरीच्या प्रयत्नांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्याच्या ताब्यातून एक व्हिडिओ क्लिप मिळाली. त्यात पाकिस्तानी सैनिक भारतीयांच्या कापलेल्या डोक्यांना घेराव घालून उभे होते. त्यामुळे जवान प्रचंड संतप्त झाले आणि बदला घेण्याचे ठरले.
७ टेहळणी कारवायांत लक्ष्य केले निश्चित
बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन जिंजर’ची योजना आखण्यात आली. ७ टेहळणी मिशनने टार्गेटचा शोध घेतला. पाकिस्तानी लष्कराच्या तीन चौक्या निश्चित करण्यात आल्या. पोलिस चौकी, हिफाजत आणि लाश्दत. सर्जिकल स्ट्राइक करणे आणि निगराणीसाठी वेगवेगळी पथके तयार झाली. दोन महिन्यांनंतर ३० ऑगस्टला हल्ला करण्याचे ठरले. त्या दिवशी मंगळवार होता. कारगिलसह आधीच्या कारवायांत मंगळवारीच लष्कराला मोठे यश मिळाले आहे. दुसऱ्या दिवशी ईदही होती. त्यामुळे तो दिवस जाणूनबुजून निवडला. कारण अशा वेळी हल्ला होणार नाही, अशी पाकिस्तानी लष्कराला अपेक्षा नव्हती.
१९ तास लाँचिंग पॅडवर लपून बसले होते भारतीय जवान
एकूण २५ सैनिकांनी हा हल्ला केला. त२९ ऑगस्टच्या पहाटे ३ वाजता सैनिक लाँचिंग पॅडवर पोहोचले. हल्ला करण्याच्या तयारीत रात्री १० वाजेपर्यंत लपून राहिले. त्यानंतर एलओसी ओलांडली. ३० ऑगस्टच्या पहाटे चार वाजता हल्ला करणारे पथक पोलिस चौकीजवळ पोहोचले. पुढील एक तासात जवळपास भूसुरुंग पेरले. नुकसान जास्तीत जास्त व्हावे हा हेतू. ३० ऑगस्टच्या सकाळी ७ वाजता सैनिकांना एका जेसीओसह चार पाकिस्तानी सैनिक चौकीकडे येताना दिसले. ते जवळ पोहोचताच भूसुरुंगाचा स्फोट घडवण्यात आला. चौघेही गंभीर जखमी झाले. नंतर भारतीय तुकडीने ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. एक पाकिस्तानी सैनिक नाल्यात उडी मारून पसार झाला. दरम्यान भारतीय कमांडोंनी तिन्ही पाकिस्तानी सैनिकांचे शिर कापले. त्यांचे रँक बिल्ले, शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्यही काढले. मृतदेहांच्या प्रेशर आयआयडी अंथरूण कमांडो मागे सरकले. सुभेदार परवेज, हवालदार आफताब आणि नायक इम्रान यांचे शिर सोबत आणले.
पळालेल्या दोन सैनिकांनाही मारले
स्फोटांचा आवाज एेकून इतर पाकिस्तानी सैनिक चौकीहून धावत आले. पण थोड्या अंतरावर तैनात असलेल्या भारतीय तुकडीने त्यांना ठार मारले. पाकिस्तानच्या इतर दोन जवानांनी या तुकडीला घेरण्याचा प्रयत्न केला, पण कव्हर देत असलेल्या तिसऱ्या भारतीय तुकडीने त्यांनाही ठार मारले. भारतीय सैनिकांना परतताना पाहिले की, आणखी काही पाकिस्तानी सैनिक चौकीकडे जात आहेत. काही वेळातच तेथेही स्फोट झाले. म्हणजेच मृतदेहांच्या खाली लावलेल्या आयईडीचा स्फोट झाला होता. यादरम्यान आणखी तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा अंदाज आहे.
... आणि २.३० वाजता परत आल्या तुकड्या
भारतीय जवानांनी ७.४५ वाजता कारवाई पूर्ण करून एलओसीकडे कूच केले. पहिली तुकडी दुपारी १२ वाजता आणि शेवटची तुकडी २.३० वाजता परतली. म्हणजे भारतीय सैनिक एकूण ४८ तास शत्रूच्या सीमेत होते. हल्ल्यात किमान १० पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते,असा अंदाज आहे. या वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, तुटलेल्या डोक्यांचा फोटो घेतल्यानंतर लष्कराने त्यांचे दफन केले. पण दोन दिवसांनंतर एक वरिष्ठ जनरल आले आणि त्यांनी शिर जाळून टाकून त्यांची राख किशनगंगा नदीत टाकण्याचे आदेश दिले. डीएनएचा पुरावा राहू नये हा हेतू. जवानांनी त्याप्रमाणे केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसे राबवले गेले होते ऑपरेशन जिंजर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...