नवी दिल्ली - धर्मांतराच्या मुद्द्यावर विरोधकांनी गुरुवारी संसद डोक्यावर घेतली. त्यांनी या मुद्द्यावर पुन्हा पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. दुसरीकडे संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी संघास एक महान संघटना ठरवत कौतुक केले.
यामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला. आग-यात नुकतेच धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. विरोधकांनी पंतप्रधानांकडे त्यावर स्पष्टीकरण मागितले आणि सभागृहात प्रस्ताव मंजूर करण्यासही त्यांनी सांगितले. विरोधकांनी त्याआधी प्रश्नोत्तराचा तास रोखत या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. सभापतींनी त्यास नकार दिल्यावर विरोधक घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरले. यामुळे दोन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित केले. यानंतर चर्चेला उत्तर देताना नायडू म्हणाले, संघ महान संघटना आहे. मला संघाच्या पार्श्वभूमीचा अभिमान आहे. धर्मांतर गंभीर बाब आहे. मात्र, पक्षांना दोष देणे उपाय नाही.
शेतक-यांचे 'अच्छे दिन' कधी?
राज्यसभेत विरोधकांचा केंद्र सरकारला सवाल
देशात कृषी व्यवसायावर आलेल्या संकटांमुळे आत्महत्येचा मार्ग पत्कारण्याची पाळी आलेल्या शेतक-यांचे 'अच्छे दिन' कधी येणार, असा खडा सवाल विरोधकांनी गुरुवारी राज्यसभेत केंद्र सरकारला विचारला. सरकार फक्त बड्या उद्योगपतींना मदत करत असल्याचाही आरोपही त्यांनी केला.
देशातील कृषी संकटावर चार तास चाललेल्या चर्चेची सुरुवात करताना काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा म्हणाले, अल्प उत्पादन, नापिकी, कर्जबाजारीपणा, कमी मागणी आदी कारणांमुळे आत्महत्या करणा-या शेतक-यांबाबत भाजप सरकार संवेदनाहीन झाले आहे. या मुद्द्यावर सरकारचे डोळे कधी उघडतील, शेतक-यांचे अच्छे दिन कधी येतील, असा प्रश्न त्यांनी विचारला. देशासाठी समस्या सोडवण्याचे सरकारचे उत्तरदायित्व आहे, तुमचे पंतप्रधान याच घोषणेमुळे सत्तेत आले होते, असेही शर्मा म्हणाले. शेतक-यांच्या दयनीय अवस्थेला सरकार जबाबदार आहे. शेतमालाच्या किमती घसरत असून किमान हमी भाव वाढवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारला फक्त बड्या उद्योगपतींचीच चिंता आहे काय? आधीच एनपीएच्या बोजाने दबलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांवर उद्योगपतींना मोठमोठी कर्जे देण्यास भाग पाडले जात आहे. दुसरीकडे शेतक-यांसाठी कर्ज महाग करण्यात आल्याचेही शर्मा म्हणाले. समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव म्हणाले, सरकारने बड्या उद्योगपतींची कित्येक लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली.