आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहाबुद्दीनला सिवान येथून तिहारमध्ये हलवण्याचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजदचा वादग्रस्त नेता मोहंमद शहाबुद्दीन याच्याविरुद्धच्या खटल्यांची सुनावणी मुक्त वातावरणात व्हावी यासाठी त्याला आठवडाभरात  बिहारच्या सिवान येथून तिहार तुुरुंगात हलवण्यात यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बिहार सरकारला दिले.    

न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने हे निर्देश देताना सांगितले की, सुनावणी मुक्त वातावरणात व्हावी हे पाहणे सरकारचे कर्तव्य आहे. शहाबुद्दीनविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यांची सुनावणी आता तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करावी.  सिवान येथील चंद्रशेखर प्रसाद आणि दिवंगत पत्रकार राजदेव रंजन यांची पत्नी आशा रंजन यांनी याबाबत याचिका दाखल केली होती.
 
‘शहाबुद्दीनविरुद्धच्या खटल्याची सुनावणी मुक्त वातावरणात व्हावी म्हणून त्याला बिहारच्या तुरुंगातून राज्याबाहेर हलवावे,’ अशी मागणी या दोघांनी केली होती. प्रसाद यांच्या तीन मुलांचा दोन वेगवेगळ्या अपघातांत मृत्यू झाला आहे, तर पत्रकार राजदेव यांचा सिवानमध्ये खून झाला आहे. या प्रकरणात शहाबुद्दीनविरोधात आरोप आहेत. शहाबुद्दीनला सिवान तुरुंगातून तिहार तुरुंगात हलवण्यास आपला विरोध नाही, असे बिहार सरकारने याआधी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते. शहाबुद्दीनच्या विरोधात ४५ खटले सुरू असून त्यात झारखंडमधील एका खटल्याचाही समावेश आहे, अशी माहिती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली होती.  
 
तेजप्रतापविरोधातील याचिकेवर २१ एप्रिलला होणार सुनावणी
राजदचा तुरुंगवासी नेता मोहंमद शहाबुद्दीन याच्या जवळच्या शार्प शूटरसोबत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारचे आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांचे छायाचित्र माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे तेजप्रताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या याचिकेची सर्वोच्च न्यायालय तपासणी करणार आहे.  

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारीच शहाबुद्दीनला बिहारच्या सिवान तुुरुंगातून तिहार तुरुंगात हलवण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने तेजप्रताप यांचा मुद्दा प्रलंबित ठेवला. आपण याप्रकरणी २१ एप्रिलला युक्तिवाद एेकू, असे न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती अमितवा रॉय यांच्या खंडपीठाने सांगितले. गेल्या वर्षी मे महिन्यात पत्रकार राजदेव रंजन यांची सिवानमध्ये हत्या झाली होती. या खून प्रकरणाचा कट रचल्याबद्दल आणि फरार असलेल्या आरोपींना आश्रय दिल्याबद्दल शहाबुद्दीन,तेजप्रताप यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी याचिका राजदेव यांची पत्नी आशा रंजन यांनी दाखल केली आहे.
 
त्यावर न्यायालयाने हे निर्देश दिले.  राजदेव खून प्रकरणातील फरार आरोपी मोहंमद कैफ ,मोहंमद जावेद हे फरार होते. त्या वेळी आपण त्यांना न्यूज चॅनल्सवर तेजप्रताप यांच्यासोबत पाहिले होते, असे आशा रंजन यांनी सांगितल्याची माहिती त्यांच्या वकिलाने कोर्टात दिली होती. शहाबुद्दीन, तेजप्रताप यांच्याविरोधात गुन्ह्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर निर्णय घेण्यात येईल, असे सुप्रीम कोर्टाने १७ जानेवारीला सांगितले होते.  
बातम्या आणखी आहेत...