आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडात मोदींनी केलेले दावे खोटे, पंतप्रधान जातील तिथे जाणार काँग्रेस प्रवक्ते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परदेश दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूपीए सरकारवर टीका केल्यानंतर काँग्रेसचा पारा चढला आहे. मोदी आता जिथे जातीत तिथे त्यांच्या मागे काँग्रेसचा प्रवक्ता जाईल आणि त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देईल अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केली आहे. पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शर्मा यांनी मोदींच्या प्रत्येक टीकेला जशास तसे उत्तर देण्याची पक्षाची तयारी असल्याचे सांगितले.
आनंद शर्मा म्हणाले, 'पंडित जवाहरलाल नेहरुंपासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या सर्व नेत्यांनी पंतप्रधानपदाचा सन्मान राखला आहे. मात्र, नरेंद्र मोदी विजयाच्या जल्लोषात सर्वकाही विसरले आहेत. ते परदेशातही विरोधीपक्ष आणि आधीच्या सरकारवर टीका करत आहेत. आता त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ते जिथे जातील तिथे आमचा प्रवक्ता जाऊन त्यांची विधाने खोडून काढेल.'
काँग्रेस प्रवक्ते शर्मा म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले हल्ले हे सहनशिलतेच्या पलीकडे झाले आहेत. मात्र चिंतेची बाब ही आहे, की ते मागील सरकारने केलेले सर्वच काम नाकारत आहेत. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की ते परदेशात भाजप किंवा आरएसएसच्या वतीने नाही तर देशाचे पंतप्रधान म्हणून जात आहेत. त्यांनी त्यांच्या पदाचा सन्मान राखला पाहिजे.'
पंतप्रधान खोटे बोलत आहेत - काँग्रेस, मनमोहनसिंगांनी केला होता कॅनडा दौरा
काँग्रेस प्रवक्ते शर्मा यांनी मोदींचा दावा खोटा असल्याचे सांगितले. 42 वर्षांत एकाही भारतीय पंतप्रधानाने कॅनडामध्ये पाय ठेवला नव्हता. असा दावा मोदींनी केला होता. हे पूर्णपणे खोटे असल्याचे शर्मा म्हणाले. ते म्हणाले, की 2010 मध्ये कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्या निमंत्रणावरुन तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग कॅनडाला गेले होते. याचे अनेक पुरावे आहेत. त्यावेळी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. मात्र, मोदींनी हे सर्व नाकारत जगासमोर स्वतःचे हसे करुन घेतले आहे. यावेळी आनंद शर्मा यांनी मनमोहनसिंग आणि कॅनडाच्या पंतप्रधानांचे फोटो पत्रकारांना दाखवले. याआधी काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विटरवर मोदींचे दावे फेटाळले होते.

भारत आधी काय भीख मागत होता का ? काँग्रेसचा सवाल
शर्मा म्हणाले की पंतप्रधान परदेशात जाऊन देशाची मानहानी करत आहेत. ते म्हणाले,'मोदींनी परदेश दौऱ्यात अशी काही वक्तव्ये केली आहेत, ज्यामुळे पंतप्रधान पदाचा सन्मान कमी झाला आहे. ते म्हणाले की भारत आता भीख नाही मागणार. याचा अर्थ काय होतो, याआधी भारत भीख मागत होता ? त्यांनी परदेशात जाऊन आधीच्या सरकारचा विशेषतः यूपीए सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.' शर्मा म्हणाले, पंतप्रधानांनी देशात तर राजकीय संवादाचा स्तर खालच्या पातळीवर नेऊन ठेवला आहेच आता ते बाहेर देशात जाऊन तो आणखी खाली नेत आहेत.
शर्मा म्हणाले, 'यूपीए सरकारच्या काळात देशाचा जीडीपी दोन ट्रिलियन डॉलरवर पोहोचला होता. ज्या भारताला ते स्कॅम इंडिया म्हणतात, तो एक महान देश आहे. त्यांची महान संस्कृती आहे. भारताने 10 उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. चंद्रावर, मंगळापर्यंत झेप घेतली आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंपासून डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंत कोणीही देशाच्या सन्मानाशी खेळ केलेला नाही, त्याचा सन्मान कमी होईल असे वक्तव्य केलेले नाही. मात्र मोदींनी या सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सर्व संकेत नाकारत देशाच्या प्रतिष्ठेला, सन्मानाला धक्का लावला आहे.'