आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Over 2,500 Posts Of IAS, IPS Vacant Across The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाला अडीच हजार आयएएस, आयपीएस अधिका-यांची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एकीकडे लालफीतशाहीचा वरचष्मा, तर दुसरीकडे दुर्गा शक्तीसारखे आयएएस अधिकारी निलंबित केले जात असले तरी देशाला आजघडीस भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) विभागांत 2500 पेक्षा अधिक अधिका-यांची गरज आहे. गुरुवारी राज्यसभेत याबाबत माहिती देण्यात आली.

कार्मिक, तक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी सांगितले की, देशभरात या अधिका-यांची एकूण 2573 पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम प्रशासकीय सेवेवर होताना दिसत आहे. यात 1480 आयएएस अधिकारी, तर 1093 पदे आयपीएस अधिका-यांची आहेत. देशात एकूण स्वीकृत पदांमध्ये आयएएस अधिका-यांची 6217, तर आयपीएस अधिका-यांची 4730 पदे आहेत.

निलंबनाच्या एका वर्षानंतर दखल
०नारायणसामी यांनी सांगितले की, केंद्र सरकार निलंबित आयएएस आणि आयपीएस अधिका-यांच्या निलंबन प्रकरणांची दखल एक वर्ष उलटून गेल्यानंतरच दखल घेते. शिस्तभंगाच्या प्रकरणांत राज्य सरकार आयएएस अधिका-यांना निलंबित करू शकते, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र एखाद्या अधिका-याला बरखास्त, बदली किंवा सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा अंतिम अधिकार फक्त केंद्र सरकारकडेच असतो. संबंधित अधिका-याने नियमांनुसार केंद्र सरकारकडे अपील केले तरच केंद्र त्यात दखल देऊ शकते.

०नारायण सामी यांच्यानुसार, गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने एकाही राज्य सरकारच्या अशा शिस्तभंगाच्या कारवाईत हस्तक्षेप केलेला नाही. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश सरकारने गेल्या महिन्यात 2010 बॅचच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांना निलंबित केले होते. वाळूमाफियांच्या दबावाखाली अखिलेश सरकारच्या निर्णयाविरुद्ध राज्यासह देशभर जनक्षोभ उसळला होता. तसेच सरकारवर प्रचंड टीका झाली होती.

वानवा असण्याचे कारण काय?
० वाढत्या विकासामुळे कॅडरचे कार्यक्षेत्र विस्तारले असून कामाचा ताण वाढला आहे.
० प्रशिक्षणाची गरज आणि व्यवस्थापकीय गुणवत्तेत कमतरता.
० त्याच्याशी सुसंगत पायाभूत सुविधा उपलब्ध नसणे.