आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Padam Award Declared; Padam Vibhushan To Mashelkar And Padamshri Dabholkar

डॉ. माशेलकरांना पद्मविभूषण, तर नरेंद्र दाभोलकरांना पद्मश्री; पद्म पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी जाहीर झाले. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या विभागात देण्यात येणा-या या पुरस्कारांवर यंदा महाराष्‍ट्राचाच वरचष्मा दिसून आला. राज्यातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगाचार्य बीकेएस अय्यंगार यांना पद्मविभूषण मिळाले. अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री देण्यात आला आहे.
याशिवाय बेगम परवीन सुलताना, प्रा. ज्येष्ठराज जोशी, टेनिसपटू लिएंडर पेस यांना पद्मभूषण, तर पद्मश्रीच्या यादीत राज्यातील 16 जण आहेत. 127 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. यात दोन पद्मविभूषण, 24 पद्मभूषण, तर 101 पद्मश्री आहेत. पुरस्कार विजेत्यांमध्ये 27 महिला असून, 10 परदेशी लोकांनाही हा सन्मान मिळाला आहे. राष्‍ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारविजेत्यांचा सन्मान केला जाईल. पद्मभूषण पुरस्कारांत कमल हासन, रस्किन बाँड यांचा समावेश आहे. युवराजसिंह, परेश रावल, विद्या बालन यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.
उद्योगाला दिशा देणारे द्रष्टे शास्त्रज्ञ- केमिकल इंजिनिअरिंगमधील माशेलकरांचे संशोधन जगभरात पोहोचले. हळद, बासमती तांदूळ व कडुलिंबाचे पेटंट भारताकडे कायम ठेवण्यासाठी त्यांनी अमेरिकेशी न्यायालयीन लढाई लढली. इंडस्ट्रियल रिसर्चचे (सीएसआयआर) प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान- जगप्रसिद्ध ‘अय्यंगार योगा’चे जनक बीकेएस अय्यंगार (94) यांनी भारतीय योगशास्त्र जगभरात पोहोचवले. 1991 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘टाइम’ मॅगझिननेही त्यांची दखल घेत जगातील पहिल्या 100 प्रभावी व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला होता.
महाराष्‍ट्रातील पुरस्कारविजेते- पद्मविभूषण : डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान-अभियांत्रिकी),- बीकेएस अय्यंगार (योगाचार्य)
पद्मभूषण : - परवीन सुलताना (शास्त्रीय गायन), - प्रा. ज्येष्ठराज जोशी (विज्ञान), -लिएंडर पेस (टेनिस)
पद्मश्री : नयना आपटे जोशी (कला), विजय घाटे (तबला), राममोहन (चित्रपट-अ‍ॅनिमेशन), परेश रावल (चित्रपट) , सूनी तारापोरवाला (पटकथा लेखन), विद्या बालन (अभिनेत्री), दुर्गा जैन (सामाजिक), शेखर बसू (विज्ञान), रविभूषण ग्रोव्हर (विज्ञान), रामकृष्ण व्ही. होसूर (विज्ञान), राजेश सरय्या (व्यापार आणि उद्योग), प्रताप गोविंदराव पवार (व्यापार-उद्योग), डॉ. रमाकांत कृष्णाजी देशपांडे (वैद्यकीय), डॉ. शशांक जोशी (वैद्यकीय), मिलिंद वसंत कीर्तने (वैद्यकीय), डॉ. नरेंद्र दाभोलकर (सामाजिक कार्य).