आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pak Espionage Racket Samajwadi Party Mp Munawwar Salims First Reaction On Farhat Detained By Delhi Police

समाजवादीच्या खासदाराचा पीए अटकेत; 10 हजारांत विकत होता गुप्त माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या हेरगिरी रॅकेटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार मुन्वर सलीम यांच्या स्वीय सहायकाला अटक केली आहे. हेरगिरीप्रकरणी ही चौथी अटक आहे.

फरहत असे नाव असलेल्या या स्वीय सहायकाला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी रात्री खासदार सलीम यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आणि प्रदीर्घ चौकशीनंतर शनिवारी दुपारी त्याला अटक करण्यात आली, असे गुन्हे शाखेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

फरहतच्या चौकशीतून निश्चित अशी महत्त्वाची माहिती हाती लागली असून अन्य काही जणांची नावेही या रॅकेटमध्ये समोर आल्यामुळे आणखी चौकशी करणे गरजेचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला. २६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी मेहमूद अख्तर याला काही गोपनीय कागदपत्रे मिळवताना अटक करण्यात आली होती. त्याच्या संपर्कात असलेल्या या रॅकेटमधील अन्य काही लोकांनाही अटक करण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न आहे. अख्तरसोबतच पोलिसांनी राजस्थानच्या नागौर येथील मौलाना रमजान आणि सुभाष जहांगीर या दोघांनाही अटक केली होती. अन्य एक आरोपी सोहेबला जोधपूरमध्ये अटक करून पोलिसांनी दिल्लीत आणले आहे.

पाक उच्चायुक्तालयात चार हेर
पाकिस्तानच्या महमंद अख्तरने चौकशीत सांगितले, दूतावासातील चार अधिकारी फारुख हबीब, खादिम हुसेन, मुदस्सर इक्बाल चिमा आणि सादिक इक्बाल हेसुद्धा हेरगिरीत सहभागी होते. या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून लोकांना हेरगिरीसाठी तयार करत होतो. त्यांच्याकडून मिळालेली माहिती या चार अधिकाऱ्यांकडे देत होतो. त्यानंतर ही माहिती आयएसआयला दिली जात होती.

चार खासदारांचा तो पीए
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार महमंद फरहत १९९६ मध्ये पहिल्यांदाच एका खासदाराचा स्वीय सहायक झाला. गेल्या २० वर्षांत त्याने चार खासदारांचे काम केले. चारही खासदार संसदीय पक्षाच्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते.

समाजवादी पार्टीचे खासदार सलीम यांनी राज्यसभा सचिवालयास लिहिलेल्या पत्रात म्हटले की, त्यांनी फरहतला एका वर्षापूर्वी कामावर घेतले. तेव्हा त्याची सगळी चौकशी केली होती. परंतु आज समजले की, तो हेरगिरी करायचा. त्याला मी नोकरीवरून काढून टाकले आहे.

पाक उच्चायुक्तालयात आयएसआयच्या इशाऱ्यावर काम चालू
पाक उच्चायुक्तालयातून होत असलेल्या हेरगिरीप्रकरणात अटकेत असलेल्या फरहतने संसद अाणि संसदीय कमिटीशी संबंधित दस्तऐवज आयएसआयला पोहोचवले आहेत. न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हेरगिरी प्रकरणातील चौथा अारोपी पकडला गेला आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी पाक उच्चायुक्तालयातील अधिकारी महंमद अख्तरला मौलाना रमजान आणि सुभाष जहांगीरकडून गोपनीय कागदपत्रे घेताना रंगेहाथ पकडले होते. याच प्रकरणात खासदार सलीम यांच्या घरातून पस्तीसवर्षीय महंमद फरहत यास अटक करण्यात आली. तो गेल्या अनेक वर्षांपासून आयएसआयसाठी हेरगिरी करत होता. महंमद अख्तर फरहतला गोपनीय माहितीच्या बदल्यात दहा हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची लाच देत असे. हेरगिरी करताना पकडल्या गेलेल्या अख्तरला भारताने ४८ तासांत देश सोडण्यास सांगितले होते. राजनैतिक कारणावरुन त्याला अटक करण्यात आलेली नव्हती.
बातम्या आणखी आहेत...