नवी दिल्ली - पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याच्या तपासासाठी भारतात आलेल्या संयुक्त तपास पथकाचे (जेआयटी) सूर पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर बदलले आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, पठाणकोट दहशतवादी हल्ला हे ‘भारताचे नाटक’ आहे, अशी टिप्पणी जेआयटीने केली आहे. या टिप्पणीमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थांचा दुटप्पीपणी उघड झाला आहे.
‘पाकिस्तान टुडे’ या सरकार समर्थित वृत्तपत्राने आपल्या वृत्तात जेआयटीच्या सदस्याच्या नावाचा उल्लेख न करता म्हटले आहे की, हा हल्ला म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात भारताने केलेला दुष्प्रचार होता. पुरावे भारताच्या दाव्याला दुजोरा देत नाहीत. हल्ला झाल्यानंतर काही तासांतच भारतीय सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना ठार मारले होते, पण भारताने पाकिस्तानची प्रतिमा खराब करण्यासाठी चकमक तीन दिवस चालल्याचे सांगितले. जगाचे लक्ष त्याकडे वेधणे हा भारताचा हेतू होता.भारत सरकारने मात्र हा अहवाल फेटाळून लावला आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आयएसआय आणि पाकिस्तानचे लष्कर दुटप्पी भूमिका घेत आहे, हे पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तावरून दिसते. भारताने सोपवलेले पुरावे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य आहेत. तरीही एनआयएने संयुक्त तपास पथकाला पुरेसे पुरावे दिले नाहीत असे म्हणणे आश्चर्यजनक आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने गाजावाजा करून जेआयटी पथक पाठवले होते. त्यामुळे निष्पक्ष तपास होईल, असे म्हटले जाऊ लागले. परंतु पथक मायदेशी परतताच त्यांनी भारतविरोधी वक्तव्ये करून दुटप्पीपणा दाखवला आहे.
पाकिस्तानच्या तपास पथकाच्या मायदेशी पोहोचताच उलट्या बोंबा