आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाण्याबाबत पाकने पुन्हा कोलांटउडी घेतली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/लंडन - मोस्ट वाँटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाण्याबाबत पाकने पुन्हा कोलांटउडी घेतली. विशेष दूत शहरयार खान यांनी शनिवारी आधीच्या वक्तव्यावरून घुमजाव केले मला माहित नाही दाऊद कुठे आहे? बातम्यांच्या हवाल्याने मी बोललो, अशी सारवासारव त्यांनी केली.


शुक्रवारी ते म्हणाले होते की, ‘दाऊद आधी पाकिस्तानात होता. मात्र तेथून त्याला पिटाळण्यात आले आहे. माझ्या मते तो आता यूएईमध्ये असावा.’ गेल्या 20 वर्षांपासून दाऊद पाकमध्येच असल्याचे भारताने दिलेले पुरावे पाकने फेटाळले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरयार यांचे वक्तव्य एकप्रकारची कबुलीच असल्याचे समजले जात होते. त्याचे गांभीर्य लक्षात येताच शहरयार यांनी आपले विधान अधिकृत नसल्याचे स्पष्टीकरण शनिवारी दिले.

ते म्हणाले, परराष्ट्र मंत्रालयात असतानाही दाऊदच्या सूचनांबाबत माझा कधी संबंध आला नाही. तो पाकमध्ये होता की नव्हता, याची मला माहिती नाही. ते काम गृहमंत्रालयाचे आहे. बातम्यांआधारे मी ती विधाने केली होती. ती अधिकृत कबुली नाही.

दाऊदला सोडणार नाही : भारत: परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सैयद अकबरुद्दीन म्हणाले की, मुंबई साखळी बॉम्बस्फोटांची फाइल आमच्यासाठी बंद झालेली नाही. या स्फोटांचे गुन्हेगार कुठेही असो, आम्ही त्यांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.