आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Court Issues Order To Release 26 11 Plotter Lakhavi

२६/११चा मास्टरमाइंड लखवी मोकाट सुटणार! नजरकैदेची अधिसूचना इस्लामाबाद हायकोर्टात रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/ नवी दिल्ली - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रकरणात पाकिस्तानने भारताशी पुन्हा एकदा दगाबाजी केली. आधी या हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर रहमान लखवीच्या विरोधातील खटला कमकुवत केला. त्यामुळे त्याला जामीन मिळाला. आता पुन्हा त्याच्या अटकेला आव्हान देणार्‍या इस्लामाबाद हायकोर्टातील याचिकेला थोडाही विरोध केला नाही. त्यामुळे न्यायालयाने लखवीला नजरकैदेत ठेवण्याची अधिसूचना रद्द करून त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे.

पाकिस्तानच्या या दुटप्पी भूमिकेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. पेशावरच्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने लखवीला जामीन मंजूर केला होता. भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर यावर टीकेची झोड उठल्यानंतर पाकने त्याला दुसर्‍यांदा अटक केली होती. त्याला लखवीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयात सुनावणीवेळी सरकारी वकीलच हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायमूर्ती नूर- उल- हक कुरेशी यांनी लखवीला नजरकैदेत ठेवण्याची अधिसूचनाच रद्द करून टाकली.

ठोस पुरावेच दिले नाहीत:
भारताने लखवीच्या विरोधातील ठोस पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्द केले मात्र पाकिस्तानने ते मुद्दामच न्यायालयात सादर केले नाहीत. त्यामुळे लखवीच्या विरोधातील खटला कमकुवत झाला.

११ दिवसांनंतरही आव्हान देण्यास टाळाटाळ:
एटीस न्यायालयाने जामीन दिल्यानंतर ११ दिवस उलटूनही पाकिस्तानने त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले नाही. यावरून पाकिस्तानचे लख्ववरील प्रेमच स्पष्ट होते.

भारताने युनोत जावे : निकम
लखवीच्या अटकेची अधिसूचना रद्द करण्याच्या इस्लामाबाद हायकोर्टाच्या निर्णयाच्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्राकडे दाद मागावी, असे २६ /११ च्या खटल्याचे वकील उज्जवल निकम यांनी म्हटले आहे.