आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Foreign Secretary To Visit India For Heart Of Asia Meeting

पुन्हा शक्यताच: ‘हार्ट ऑफ एशिया’ बैठकीला पाक परराष्ट्र सचिव येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनेक महिन्यांच्या दोलायमान परिस्थितीनंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चेच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. मंगळवारी उभय देशांत सचिव स्तरीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी ‘हार्ट ऑफ एशिया’ संमेलनात सहभागी होण्यासाठी मंगळवारी नवी दिल्लीत दाखल होतील.

चौधरी सकाळी येऊन सायंकाळी तत्काळ इस्लामाबादसाठी रवाना होणार आहेत. या दरम्यान ते परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करतील. समग्र द्विपक्षीय चर्चेसाठी पूर्वअटी व शिष्टाचारांची निश्चिती होणे या चर्चेदरम्यान अपेक्षित आहे. हार्ट ऑफ एशिया बैठकीशिवायची ही स्वतंत्र चर्चा असेल. हार्ट ऑफ एशिया बैठकीत अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापनेसाठीच्या उपायांवर चर्चा होणार आहे. बैठकीत अफगाणिस्तान तसेच त्याच्या आसपासच्या १४ देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. याची पाचवी बैठक गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी इस्लामाबादेत झाली होती. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यात सहभागी झाल्या होत्या. भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची बैठक १५ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणार होती. मात्र पठाणकोट हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावामुळे ही बैठक टळली. पठाणकोट हल्ल्यानंतर तपास चमूंविषयी पुन्हा उभय देशांत वाद निर्माण झाले. पाकिस्तानी तपास पथक भारत दौऱ्यावर येऊन गेल्यावर सचिव स्तराच्या बैठकीची तारीख निश्चित झाली.

पठाणकोटविषयी चर्चा
परराष्ट्र सचिवांदरम्यान होणाऱ्या चर्चेत पठाणकोट हल्ल्याच्या तपासाची प्रगती आणि भारत-पाक समग्र द्विपक्षीय संवाद सुरू करण्याविषयी चर्चा होणे अपेक्षित असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यात एनआयएच्या पाकिस्तान दौऱ्याविषयी निर्णय होण्याचीही शक्यता आहे.