नवी दिल्ली- पाकिस्तानकडून अण्वस्त्रांमध्ये सातत्याने मोठी वाढ केली जात आहे. या देशाचे अण्वस्त्र धोरण असेच कायम राहिले तर 2025 पर्यंत पाकिस्तान जगातील पाचव्या क्रमांकाची न्युक्लियर शक्ती होईल. बुलेटिन ऑफ अॅटॉमिक सायंटिस्टच्या ताज्या न्युक्लियर नोटबुक रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. न्युक्लियर नोटबुकला एखाद्या देशातील अण्वस्त्रांबाबत अत्यंत विश्वासार्ह डॉक्युमेंट समजले जाते.
या रिपोर्टनुसार, पाकिस्तानकडे सध्या 110-130 न्युक्लियर वॉरहेड आहेत. 2011 पर्यंत यांची संख्या 90-110 पर्यंत होती. त्यात सातत्याने वाढ केली जात आहे. याच्या वाढीची गती बघितली तर 2025 पर्यंत पाकिस्तान जगातील पाचव्या क्रमांकाची न्युक्लियर शक्ती होईल. त्यावेळी पाकिस्तानकडे 220-250 अणूबॉम्ब राहतील.
आणखी काय सांगितले या रिपोर्टमध्ये
- यात प्रसिद्ध न्युक्लियर एक्सपर्ट हॅस क्रिस्टेंसन आणि रॉबर्ट नॉरिस यांनी सांगितले, की पाकिस्तान सध्या शॉर्ट रेंज असलेल्या न्युक्लियर मिसाईल विकसित करीत आहे. भारताकडून करण्यात आलेल्या कोणत्याही कारवाईचे लगेच प्रत्युत्तर देणे यामागचा उद्देश आहे. भारताने लहान युद्ध छेडले तरी यांचा वापर होऊ शकतो.
- पाकिस्तानने विकसित केलेल्या नवीन न्युक्लिअर मिसाईलचे नाव हत्फ-9 असे आहे. याची रेंज 60 किलोमीटर आहे. भारतातील शहरांना टार्गेट करण्यासाठी हे विकसित करण्यात आले नाही. मैदानी युद्धात वापर करण्यासाठी पाकिस्तानने याची निर्मिती केली आहे.
- पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी छावण्यांवर लष्करी कारवाई करण्यासाठी भारताकडून सैन्य आघाडी उघडली जाऊ शकते. अशा वेळी या मिसाईलचा वापर केला जाऊ शकतो.
- सध्या पाकिस्तानकडे 6 न्युक्लिअर कॅपेबल बॅलेस्टिक मिसाईल आहेत. आणखी दोन मिसाईल्सवर काम सुरु आहे. शाहीन-1A आणि शाहीन-3 या मध्यम पल्ल्याच्या मिसाईल आहेत.
- सध्या पाकिस्तान जमिनीवरुन लॉंच केली जाणारी हत्फ-7 आणि हवेतून मारा करता येईल अशी हत्फ-8 विकसित करीत आहे. तसेच पाकिस्तानच्या पाणबुडीतून लॉंच करता येईल अशाही मिसाईल डेव्हलप करीत आहे.
पाकिस्तानने केला दावा
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानी परराष्ट्र्र सचिव एजाज चौधरी यांनी सांगितले होते, की भारताच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी आम्ही लहान आकाराचे न्युक्लिअर वॉरहेड तयार केले आहेत.