नवी दिल्ली - पाकिस्तानने वाघा येथे चार भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचे साहित्य एक महिन्यापासून अडवून ठेवले आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या या घरगुती वापराच्या वस्तू आहेत. एका इंग्रजी दैनिकाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
भारतीय अधिकाऱ्यांचे सामान अडवून ठेवल्या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला अनेक स्मरण पत्रे लिहिली आहे. मात्र पाकिस्तानी रेंजर्स सामान देण्यास नकार देत आहेत. हा मुद्दा आता पाकिस्तानी रेंजर्स आणि भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता आहे. वास्तविक या बैठकीचा अजेंडा सीमेवर वाढत असलेला गोळबार आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की बीएसफ पंजाब आणि राजस्थानच्या सीमेवरुन घुसखोरांना मदत करत आहे. या बैठकीत पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व मेजर जनरल उमर फारुख बुर्की करणार आहेत. या बैठकीला 16 जण उपस्थित राहाणार आहेत, त्यात पाकिस्तान गृहमंत्रालयाचे अधिकारी आहेत.