आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचा झेंडा फडकावला; कुख्यात मसरत नजरकैदेत, ६ जणांवर कारवाई, सभाही रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/नवी दिल्ली - हुरियत कॉन्फरन्सच्या मसरत आलम, सय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक आणि शब्बीर शाहसह ६ फुटीरवादी नेत्यांना गुरुवारी रात्री नजरकैदेत ठेवण्यात आले. हे नेते शुक्रवारी पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सभा घेणार होते. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या आदेशानंतर पोलिसांनी सभेची परवानगी रद्द केली आहे.
फोटो - या प्रकारानंतर देशभरात मसरतचा पुतळा आणि पाकिस्तानी झेंडे जाळण्यात आले.

तत्पूर्वी मसरतसह हुरियत नेत्यांनी निदर्शने करताना पाकचा झेंडा फडकावल्यानंतर केंद्राने सईद सरकारला चांगलीच तंबी दिली. यानंतर सईद सरकारने मसरत आलम, गिलानी, मीरवाइज फारूक आणि इतर फुटीरवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पक्ष या कारवाईमुळे घाबरणार नाही, अशी टिप्पणी करत हुरियत कॉन्फरन्सने या कारवाईला विरोध केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी रात्रीच मुख्यमंत्री सईद यांना या फुटीरवाद्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते. जम्मू-काश्मीर भाजपनेही मसरत आणि गिलानी यांना अटक करण्याची मागणी केली होती. यावर मसरतने गुरुवारी ‘पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात काहीच गैर नाही. असे १९४७ पासून घडत आहे,’ असे राष्ट्रद्रोही वक्तव्य केल्याने पोलिसांनी त्याला रात्री नजरकैद केले.
मसरतच्या पुतळ्याचे दहन, राज्यात उग्र निदर्शने
पाक समर्थनार्थ घोषणा दिल्याने मसरतच्या विरोधात शिवसेना, पँथर्स पार्टी, बजरंग दल या संघटनांनी गुरुवारी निदर्शने केली. त्यांचा पुतळा जाळण्यात आला. मसरतला तत्काळ अटक करावी, अशी मागणी संघटनांनी केली. याला मुख्यमंत्री सईद हेच जबाबदार आहेत, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रद्रोही शक्तींशी तडजोड केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पाकच्या घोषणांसाठी आघाडी केली नाही
जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यात मुख्य भूमिका बजावणारे राम माधव म्हणाले की, पाकिस्तानच्या घोषणा दिल्या जाव्यात यासाठी भाजपने पीडीपीशी आघाडी केलेली नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये असे वातावरण तयार करावे लागेल, पण मुख्यमंत्री सईद म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे.