आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Republic Day Parade In Delhi Will Witness Pandharichi Wari On Rajpath

यावर्षी राजपथवर \'पंढरीची वारी\', बराक ओबामांना मिळणार विठ्ठल रुख्मीणीचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- यावर्षी गणतंत्रदिनी राजपथवर महाराष्ट्रातील पंढरीची वारी अवतरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना यानिमित्ताने विठ्ठल रुख्मीणीचे दर्शनही होणार आहे.
राजपथवरील पथसंचलनासाठी महाराष्ट्राकडून पंढरीची वारी हा चित्ररथ तयार करण्यात आलेला आहे. चित्ररथात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी कसून सराव केला असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रासह 16 राज्यांचे आणि 9 मंत्रालयांचे असे एकूण 25 चित्ररथ राजपथवरील पथसंचलनात सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय मोहंती यांनी सांगितले.
दरवर्षी गणतंत्र दिनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात देशातील विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टये दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या पथसंचलन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत.
महाराष्ट्राचे दैवत आणि वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक व सांस्कृतिक दर्शन चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना घडणार आहे. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिध्द कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 65 कारागिरांनी अतिशय देखणा चित्ररथ उभारला आहे.
चित्ररथाच्या प्रारंभी डोक्यावर तुळस घेतलेली स्त्री दिसणार आहे. मध्यभागी विठ्ठल रखुमाई मंदिर असणार आहे. अश्वांचे रिंगण चित्ररथावर आहे. चित्ररथाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूला पालखी, पताका, टाळ, मृदंग, वीणेसह वारीत सहभागी 130 वारकऱ्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत.

या चित्ररथावर विठ्ठल विठ्ठल तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारवली... वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गीतावर टाळ, मृदंग, वीणेच्या गजरात वारकऱ्यांच्या पाऊल्या सादर होणार आहेत. मुंबईचे संतोष भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 कलाकारांची टीम राजपथवर सादरीकरण करणार आहे.
पुढील स्लाईडवर बघा, मराठी कलाकारांनी अशा प्रकारे सादरीकरण करुन दाखविले...