नवी दिल्ली - यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी सरकारने राजपथावर सुमारे १० हजार आसने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभाचे प्रमुख अतिथी असल्याने यंदा प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. वाढवण्यात आलेल्या सर्व आसनांपैकी ८ हजार ४०० जागा १०, २०, ५०, १५० आणि ३०० रुपये दराच्या श्रेणींच्या असतील.
१६०० अतिरिक्त जागांची व्यवस्था सी-हॉक्सिजनवर करण्यात येत आहे. या ठिकाणी लोक उभे राहून परेड पाहू शकतात. दिल्लीतील मुख्य सोहळ्यासाठी दरवर्षी सरासरी सुमारे १.२ लाख जागांची व्यवस्था केली जाते. मात्र, यंदा प्रथमच त्यात वाढ करण्यात आली आहे. ३०० रुपये दर असणा-या तिकिटांची राजपथाजवळील पहिल्या किंवा दुस-या रांगेत व्यवस्था असेल. मात्र, हे तिकीट घेणा-यांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कसून चौकशी केली जाणार आहे. यासाठी त्यांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, राज्य सरकारचे ओळखपत्र किंवा अन्य कोणतेही ओळखपत्र दाखवावे लागेल. एका अन्य अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी दोन व्हीआयपी एनक्लोझर असतात. मात्र, यंदा यात व्हीआयपी एनक्लोझर व्हीजी-१३ सामील करण्यात येणार आहे.