आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parlament Disscussion News In Marathi, A Separate Telangana State Issue, Divya Marathi

संसदेत तेलंगणावरून रणकंदन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी अक्षरश: धिंगाणा झाला. एकीकडे तेलंगणा राज्यनिर्मितीला विरोध करणा-या सदस्यांचा गोंधळ सुरू होता. तर, दुसरीकडे वेगळाच मुद्दा लावून धरत काही सदस्यांनी सरकारी दस्तावेज फाडून ते आसनांच्या दिशेने उधळले. अध्यक्षांसमोरील माइक हिसकावण्याचा प्रयत्नही काही सदस्यांनी केला. दरम्यान, आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासाठी केंद्राने पाठवलेल्या विधेयकावर राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी रात्री स्वाक्षरी केली.
गेल्या आठवड्यात सभागृहात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा उल्लेख कामकाजात येताच काही सदस्य संतप्त झाले. दस्तऐवज फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यात अण्णाद्रमुकचे सदस्य व्ही. मैत्रेयन आणि द्रमुक सदस्य टी. एम. सेल्वागणपती आघाडीवर होते.
लोकसभेत तेलंगणा निर्मिती आणि जातीय हिंसाचारविरोधी विधेयकावरून रणकंदन माजले. विविध पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ माजवला. त्यामुळे या सभागृहातही कामकाज होऊ शकले नाही.
पंतप्रधानांचा भाजप नेत्यांना प्रीतिभोज : तेलंगणा निर्मितीच्या विधेयकावर राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी रात्री स्वाक्षरी केली असून आता हे विधेयक मंगळवारी राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, तेलंगणासह भ्रष्टाचारविरोधी कायद्यांना संसदेत मंजुरी मिळवण्याच्या दृष्टीने भाजपचे सहकार्य मिळवण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी काही भाजप नेत्यांना मंगळवारी रात्रीच्या प्रीतीभोजसाठी आमंत्रित केले आहे. सूत्रांनुसार डॉ. सिंग यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना रविवारी रात्री दूरध्वनीकरून हे आमंत्रण दिले.
मुख्यमंत्री-राज्यपाल भेट
हैदराबाद २ आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करणारे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी सोमवारी राजभवनावर राज्यपाल नरसिंहन यांची भेट घेतली. केंद्राने तेलंगणा निर्मितीची भूमिका कायम ठेवली तर रेड्डी राजीनामा देतील, असे मानले जाते. तेलंगणाच्या विरोधात त्यांनी दिल्लीत नुकतीच निदर्शनेही केली होती.
फारुख यांचाही विरोध
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनीही आंध्रच्या विभाजनाला विरोध केला आहे. जनता विभाजनाच्या विरोधात असेल तर राज्याची निर्मिती त्यांच्यावर लादणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
तृणमूल विरोधात
कोलकाता २तेलंगणा निर्मितीच्या विधेयकाला तृणमूल काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. संसदेत या विधेयकाला पक्षाचे सदस्य विरोध करतील, असे तृणमूलचे प्रवक्ते डेरेक ओ-ब्रेन यांनी सांगितले.
तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता आहे.