आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Rejects Pakistan Resolution On Afzal Guru

पाकिस्तानी संसदेत अफझल गुरूच्या फाशीच्या निषेधावर भारत संतप्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय संसदेवर हल्ला करणार्‍या अफझल गुरू याच्या फाशीचा पाकिस्तानी संसदेत निषेध करण्यात आल्याने दोन्ही देशांत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. पाकने काढलेल्या या कुरापतीचा भारताने तीव्र निषेध केला असून संसदेत शत्रुराष्ट्राविरुद्ध सर्व खासदार एकटवले. पाकच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. शिवाय सर्वच आघाड्यांवर पाकशी संबंध तोडून टाकावेत, अशी मागणी खासदारांनी केली.

गुरुवारी पाकिस्तानी संसदेत अफझल गुरूच्या फाशीचा निषेध करणारा ठराव पारित करण्यात आला होता. तसेच अफझलचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांना सोपवण्याची मागणीही ठरावात करण्यात आली होती. भारतीय संसदेवरील हल्ला प्रकरणी दोषी ठरलेल्या अफझल याला 9 फेब्रुवारीला तिहार तुरुंगात फासावर लटकवण्यात आले होते.

दरम्यान, या मुद्दय़ावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गोंधळ झाला. भाजपने लोकसभा आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. नंतर लोकसभेत सभापती मीरा कुमार यांनी तर राज्यसभेत अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी पाकिस्तानच्या निषेधाचा ठराव वाचला. सदस्यांनी सर्वसंमतीने तो पारित केला.

दहशतवादाला पाठिंबा असल्याचे सिद्ध
अफझल गुरूला पाठिंबा दर्शवून पाकिस्तानने आपला दहशतवादाला पाठिंबा असल्याचेच सिद्ध केले आहे. जोवर पाक या प्रस्तावावरून माघार घेत नाही तोवर त्या देशाशी चर्चा करू नये, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे. पाकशी संबंध सुधारण्याच्या दिशेने एकही पाऊल पुढे टाकू नये. तसेच पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांना तातडीने परत बोलवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पाकशी संबंध तोडा : खासदारांची एकमुखी मागणी
भारतीय संसदेत पारित करण्यात आलेल्या प्रस्तावात पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा देण्यात आला. दहशतवादाला पाठिंबा देऊन भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका, सबंध देश एकजुटीने प्रत्युत्तर देईल, अशा शब्दांत यात पाकला ठणकावले आहे.

परराष्ट्र धोरणातच उणीव
संसदेवर हल्ला करणार्‍याची बाजू घेणारा प्रस्ताव पाकिस्तान पारित करतो. दुसरीकडे भारतीय मच्छीमारांच्या मारेकर्‍यांना भारतात परत पाठवण्यास इटली नकार देते. र्शीलंकेत तामिळ लोकांवर सतत अत्याचार होत आहेत. याचा अर्थ भारताच्या परराष्ट्र धोरणातच काहीतरी उणीव आहे.’ अरुण जेटली, विरोधी पक्षनेते, राज्यसभा

भारत-पाक आगामी हॉकी मालिका रद्द
भारतात होणारी पाकिस्तानविरुद्धची आगामी हॉकी मालिका परराष्ट्र मंत्रालयाने रद्द केली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पाकिस्तानी संघ एप्रिलमध्ये भारताच्या दौर्‍यावर येणार होता. ही मालिका संपल्यावर भारतीय संघही पाक दौर्‍यावर जाणार होता. दोन्ही देशांत यापूर्वी 2006 मध्ये हॉकी मालिका झाली होती.