आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून अधिवेशन : भूसंपादन, काश्मीर प्रश्न, अवकाळी नुकसान भरपाई मुद्दा गाजणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात रखडलेली अनेक विधेयके मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भूसंपादन विधेयक, अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसलेल्या शेतक-यांच्या तक्रारी व नुकसान भरपाई, काश्मीर खो-यातील चिघळलेली परिस्थिती यामुळे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे असून गोंधळाचीही शक्यता आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधी काँग्रेसने भूसंपादन विधेयकाविरोधात रामलीला मैदानावर रॅली घेऊन अाक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटतील.

संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र १३ दिवसांचे आहे व अनेक विधेयके प्रलंबित आहेत. भूसंपादनाचा अध्यादेश पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा लोकसभेत सादर केला जाणार आहे. याशिवाय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज येमेनमधील ताज्या घडामोडी व भारतीयांना काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष अभियानाची माहिती देतील. त्यामुळे संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी भाजपच्या सर्व खासदारांची अधिवेशनातील उपस्थिती अनिवार्य असल्याचे स्पष्ट करतानाच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीकेची संधी सोडलेली नाही. नायडू म्हणाले की, भाजप खासदारांना आत्मचिंतन वा अभ्यासासाठी सुटी हवी असेल तर ते अधिवेशनानंतर जाऊ शकतात.

दरम्यान, काँग्रेसकडून कामकाजात व्यत्यय आणला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले, विरोधकांना सरकारवर जे काही हल्ले करायचे आहेत ते त्यांनी संसदेतच केले तर बरे होईल. अधिवेशनाचा दुसरा टप्पाही भक्कम असेल. कारण खासदार नव्या दमाने परत येतील. या सत्रातही चांगली चर्चा व सकारात्मक परिणाम िदसतील असा मला विश्वास आहे. सरकार बनल्यापासून कामकाजाचे प्रमाण १२५ टक्क्यांपर्यंत गेले आहे.

या महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा
- भूसंपादनाचा सुधारित अध्यादेश
- वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक
- मालमत्ता पुनर्विकास व नियमन विधेयक
- अघोषित विदेशी उत्पन्न व संपत्ती विधेयक
- लघु व मध्यम उद्योग विकास (दुरुस्ती) विधेयक