आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी यांच्या भ्रष्टाचाराचे माझ्याकडे पुरावे, मला बोलू दिले तर ‘भूकंप’ येईल : राहुल गांधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीच्या मुद्द्यावर आणखी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराची आपल्याकडे माहिती असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. लाेकसभेत नोटबंदीच्या मुद्द्यावर आपल्याला बोलू दिले तर ‘भूकंप’ येईल, असा दावा दोन दिवसांपूर्वीच राहुल यांनी केला होता. राहुल यांचे आरोप ‘चुकीचे,’निराधार’ व ‘दुर्दैवी’ असल्याचे सांगत भाजपने हे आरोप फेटाळले आहेत.

नोटबंदीवरील लोकसभेतील कोंडी बुधवारी फुटली नाही. विरोधी पक्षाच्या १५ नेत्यांसोबत संसद भवन परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले, सर्व विरोधकांना संसदेत नोटबंदीच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे. मात्र सरकारला चर्चेत रस नाही. मोदींनी दूर पळण्यापेक्षा संसदेत यावे व आम्हाला बोलण्याची संधी द्यावी. मग विरोधक खरे बोलतात की मोदी याचा निर्णय देशातील जनतेनेच घ्यावा.
मी तोंड उघडल्यास फुगा फुटण्याची मोदींना भीती
मोदींच्या वैयक्तिक भ्रष्टाचाराचा सविस्तर तपशील माझ्याकडे आहे. मला ताे लोकसभेत मांडायचा आहे. परंतु मी तोंड उघडले तर मोदींना त्यांचा फुगा फुटण्याची भीती आहे. त्यामुळेच मोदी मला लोकसभेत बोलू देत नाहीत.
- राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष
राहुलकडे माहिती असेल तर आताच सांगावी
राहुल गांधी यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी ती आताच सांगावी. त्यांचे आरोप निराधार आहेत. नैराश्यापोटी ते बोलत आहेत. लोकसभेत त्यांना बोलू दिले जात नाही, असे म्हणतात. पण प्रत्येक दिवशी काँग्रेस सदस्य हौद्यात येत आहेत. आता ते निराधार आरोप करत अफवा पसरवत आहेत.
- अनंत कुमार, संसदीय कार्यमंत्री
मग संसदेबाहेर मोदींचा भंडाफोड का करत नाही?
राहुल गांधी यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी पंतप्रधानांचा पर्दाफाश करावा. पुरावेच असतील तर ते संसदेबाहेरच पंतप्रधानांचा भंडाफोड का करत नाहीत? काँग्रेस-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण सामना सुरू आहे. त्यामुळे ते एकमेकांना उघडे पाडू शकत नाहीत - अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री.
पाच शहरांत छापे
३ कोटी ३५ लाखांच्या नवीन नोटा जप्त
नवी दिल्ली | बुधवारी ५ शहरांत छापे मारून ३ कोटी ३५ लाखांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या. बंगळुरूत एका फ्लॅटमधून २.८९ कोटी जप्त करण्यात आले. त्यात २.२५ कोटींच्या नव्या नोटा आहेत.

गोवा | महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बांद्यातून पोलिसांनी ८६ लाखांच्या नव्या नोटा जप्त केल्या. पणजीत तीन लोकांना अटक करून २४ लाखांच्या नव्या नोटा पकडण्यात आल्या.

चंदीगड | सक्तवसुली संचालनालयाने एका कापड व्यापाऱ्याकडून २.१९ कोटींच्या नोटा जप्त केल्या. त्यात १८ लाखांच्या नव्या नोटा आहेत.

दिल्ली | एका हॉटेलवर छापा मारून ३.२५ कोटींच्या जुन्या नोटा जप्त केल्या. पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबई | नोटबंदीनंतर मुंबई विमानतळावर ७० कोटी रुपये रोकड आणि १७० किलो सोने जप्त केल्याचे सीआयएसएफने सांगितले.

५ लॉकर्समध्ये १० कोटी रुपये
प्राप्तिकर विभागाने पुण्यात महाराष्ट्र बँकेच्या पर्वती शाखेवर छापा टाकून ५ लॉकर्समधून १० कोटी रुपये जप्त केले. यात किती नव्या नोटा होत्या ते रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये परिसरातील थेरगावात पोलिसांनी एका कारमधून ६२ लाखांच्या नवीन नोटा तर पाच लाख रुपयांच्या शंभरच्या नोटा जप्त केल्या.
बातम्या आणखी आहेत...