आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Struggles On The Road, Monsoon Session

संसदेतील संघर्ष रस्त्यावर, पावसाळी अधिवेशन पाण्यात, शेवटही गोंधळानेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमधील ज्या कडवटपणाने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला होता, त्याच कडवटपणाने गुरुवारी ते संपलेही. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे ११९ तास अक्षरश: पाण्यात गेले. अधिवेशनाचा शेवटचा दिवसही गोंधळानेच गाजला. लोकसभेत काँग्रेसच्या नेतृत्त्वात विरोधी पक्षाने सभात्याग केला आणि रालोआच्या विरोधात संसद परिसरात धरणे दिली. सत्ताधारी रालोआचे खासदारही काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यांनी विजय चौकातून संसद परिसरातील गांधी पुतळ्यापर्यंत ‘लोकशाही बचाओ मोर्चा’ काढला.
काँग्रेसविरोधात मोहीम
रालोआने लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना घेरण्याची योजनाही आखली आहे. काँग्रेसच्या ४४ व ९ डाव्या खासदारांनी संसदेचे कामकाज होऊ दिले नाही, त्यामुळे त्यांच्या मतदार संघात आंदोलन करण्यात येईल, असे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले.
गुरूवारच्या रालोआच्या बैठकीत काँग्रेस विरोधात महिनाभर मोहीम उघडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या खासदारांनी विनाकारण विरोध करून कामकाज ठप्प पाडले. त्यामुळे एक मंत्री आणि चार खासदारांचे पथक या खासदारांच्या मतदार संघात जाऊन त्यांच्या गैरकृत्याचा पाढा जनतेसमोर वाचेल, असे जेटली यांनी सांगितले.

पंतप्रधान डरपाेक : राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, संघ परिवार, भाजप व मोदींच्या कुशासनापासून देशाला वाचवण्यासाठी आमचा संघर्ष आहे. हे लोकशाहीचा गळा घोटण्याच्या तयारीत आहेत. गेल्यावर्षी निवडणुकात आम्ही पराभूत झालो तेव्हा या माणसात (मोदी) धमक आहे असे वाटले होते. मात्र त्यांच्यात अजिबात धमक नाही,असे आज वाटू लागले आहे. पंतप्रधान डरपोक आहेत, हे लक्षात येत आहे. आम्ही त्यांच्यावर हल्ले चढवतच राहू. भूसंपादनाची लढाई अवघड जाईल असे वाटले होते. परंतु आमची ४० खासदारांची टीम आणि अन्य पक्षाचे खासदार आडून बसले. मोदींमध्ये गट्स असतील आणि ते हे विधेयक मंजूर करतील असे वाटले होते परंतु दबाव वाढताच मोदींनी तोंड लपवून पळ काढला. आम्ही त्यांच्यावर एवढा दबाव आणू की ललित मोदी मायदेशी येईल व क्रिकेटची सफाई होईल.

काँग्रेसचे वर्तन आणीबाणी : मोदी
काँग्रेसचे संसदेतील वर्तन आणीबाणीसारखेच आहे. देशाची सत्ता केवळ एकाच कुटुंबाच्या हाती रहावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेस एका कुटुंबाला वाचवू इच्छिते तर भाजप संपूर्ण देशाला वाचवू इच्छिते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआच्या बैठकीत केली. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आधी निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. हा संघराज्य लोकशाही मोठा हादरा आहे.नागाचा मुद्दा नागालँड आणि ईशान्येतील अन्य राज्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. परंतु काँग्रेस त्यालाही विरोध करत आहे, असे मोदी म्हणाले.
पुन्हा अधिवेशनाचा पर्याय खुला
तांंत्रिकदृष्ट्या पुन्हा संसदेचे अधिवेशन घेण्याचा पर्याय खुला आहे. कॅबिनेटच्या राजकीय समितीने अधिवेशन समाप्तीची शिफारस न करण्याचा निर्णय घेतला. अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित केले असेल तर अशा स्थितीत पुन्हा अधिवेशन बोलावले जाऊ शकते.

किती झाले कामकाज? लोकसभा : ४६ % (४७ तास २७ मिनिटे) कामकाज झाले. ३४ तास ४ मिनिटे गोंधळात गेली. भरपाईसाठी ५ तास २७ मिनिटे ओव्हर टाइम केला. लोकसभेत १० विधेयके सादर झाली. त्यापैकी ६ मंजूर करण्यात आली. { राज्यसभा : ९ % (नऊ तास) कामकाज झाले. ८२ तास गोंधळातच गेले. राज्यसभेत दोन विधेयके मंजूर झाली. तीन विधेयके परत पाठवण्यात आली.