आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Was Run Field; Regrets President Pranab Mukharjee

संसदेचे झाले रणमैदान; राष्ट्रपती प्रणवदांची खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेत चर्चा होणे अपेक्षित असते. त्याऐवजी संसदेचे आता रणमैदान झाले आहे, अशी खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली. लोकशाही संस्था जर दबावाखाली असतील तर जनता व त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांनीच सुधारणात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी ही खंत व्यक्त केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कुठलेही कामकाज न झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही प्रतिक्रिया होती. राष्ट्रपती म्हणाले, ‘आपल्या लोकशाहीची मुळे खोलवर गेलेली आहेत, पण आता पानगळ सुरू झाल्यामुळे नूतनीकरणाची वेळ आली आहे. आपण आताच कृती करायला हवी.
१९४७ मध्ये भारताच्या स्वप्नांना आकार देणाऱ्यांबद्दल आपल्या मनात आदर आणि अभिमान आहे. तशी भावना सात दशकांनंतर आपल्या वारसांच्या मनात आपल्याबद्दल राहील का? या प्रश्नाचे उत्तर फारसे सुखदायी नसेल. पण हा प्रश्न आपण विचारायलाच हवा.’ लोकशाही ही राज्यघटनेने दिलेली सर्वांत मौल्यवान देणगी आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.

‘आपण मानवतेवरील विश्वास गमवायला नको, मानवता एखाद्या महासागराप्रमाणे आहे. महासागराचे काही थेंब घाण असले तरी महासागर घाण होत नाही,’ हे महात्मा गांधींजींचे वचन त्यांनी उद्धृत केले.
देशाची प्रगती मूल्यांच्या सामर्थ्याद्वारे मोजली जाते. मात्र त्याचबरोबर ती आर्थिक प्रगती आणि देशाच्या स्रोतांचे समान वितरण या निकषांद्वारेही मोजली जाते. प्रगतीचे फायदे गरिबांपर्यंतही पोहोचायला हवेत, असा उल्लेख करून मुखर्जी म्हणाले, आपली अर्थव्यवस्था भविष्यकालीन आशाअपेक्षांचे वचन देत आहे.

पाकिस्तानला इशारा
पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा देताना राष्ट्रपती म्हणाले, राज्याच्या धोरणाचे हत्यार म्हणून दहशतवादाचा वापर करण्याचा प्रयत्न भारत नाकारत आहे. त्यामुळे भारताचे शत्रू असणाऱ्या घटकांनी त्यांची जमीन दहशतवादासाठी वापरली जाऊ नये, याची काळजी‘आमच्या शेजाऱ्यांनी’ घेणे आवश्यक आहे.