आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Winter Session Direction Determine Assembly Election Result

विधानसभा निकालावर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची ठरणार दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारपासून सुरू होणा-या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची दिशा निश्चित करणार आहेत. केंद्र सरकारने या अधिवेशनात अनेक विधेयके मांडण्याची तयारी केलेली असतानाच या अधिवेशनाचा 12 दिवसांचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत असतानाच विधानसभा निवडणुकांचे निकाल राजकीय पक्षांच्या भूमिका बदलण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.
आंध्र प्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे विधेयक केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात मांडणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नसले तरी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी त्याबाबत सरकार वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षाने सरकारची कोंडी करण्यासाठी अनेक शस्त्रे परजून ठेवली आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून त्याची झलक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महागाईच्या मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव आणण्याची भाजप आणि डाव्या पक्षांची योजना आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार विविध 38 विधेयके मांडणार आहे. सरकारच्या विधेयकाच्या यादीत तेलंगणा निर्मितीच्या विधेयकाचा समावेश नाही. परंतु हे विधेयक जलदगतीने मांडण्याचे आश्वासन सरकारकडून दिले जात आहे. तेलंगणा निर्मितीच्या विधेयकाच्या मसुद्याला एक मंत्री समूह अंतिम स्वरूप देत आहे. राष्ट्रपतींकडून ते विधेयक आंध्र प्रदेश विधानसभा आणि संसदेकडे पाठवले जाण्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाची या विधेयकाला मंजुरी घेतली जाणार आहे. गुरुवारपासून अधिवेशनाला सुरुवात होत असली तरी लोकसभा आणि राज्यसभेचे प्रत्यक्ष कामकाज मात्र सोमवारपासूनच सुरू होण्याची शक्यता आहे. कारण पहिल्या दिवशी संसदेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित केले जाईल.
अधिवेशनाचा दुसरा दिवस 6 डिसेंबर रोजी येत आहे. 1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यापासून दरवर्षीच या दिवशी संसदेचे कामकाज विस्कळीत केले जाते.
महिला आरक्षण, लोकपाल प्राधान्यक्रमावर
महिला आरक्षण विधेयक आणि लोकपाल विधेयक ही दोन्ही महत्त्वाची विधेयके मंजूर करवून घेण्याला केंद्र सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम राहणार आहे. ही दोन्ही विधेयके संसदेच्या एका सभागृहाने मंजूर केली असून दुस-या सभागृहात ती प्रलंबित आहेत.
निकालच ठरवणार अधिवेशनाचा कालावधी
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी असली, तरी तो वाढवायचा की निश्चित कालावधीच्या आधीच अधिवेशन गुंडाळले जाईल, हेही पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर अवलंबून राहणार आहे. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे निकाल रविवारी तर मिझोरामचे निकाल सोमवारी जाहीर जाहीर होणार आहेत.
कोणाला काय हवे?
भाजप : तेलंगणच्या मुद्द्याबरोबरच नरेंद्र मोदींच्या पाटण्यातील सभेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातील अंतर्गत सुरक्षेवर भाजपला चर्चा घडवून आणायची आहे. त्याचबरोबर महिला अत्याचार, चीन, पाकिस्तानकडून सीमेवर होणारे आक्रमण हे मुद्देही भाजपच्या अजेंड्यावर आहेत.
डावे पक्ष : मुझफ्फरनगर जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर देशातील जातीय सलोख्याची स्थिती आणि देशावरील आर्थिक संकट या मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशनात चर्चा घडवून आणण्याची डाव्या पक्षांची मागणी आहे.
...आणि असे देणार प्रत्युत्तर : भाजपकडून सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नातील हवा काढून घेण्याची तयारी काँग्रेस आणि मित्रपक्षांनीही करून ठेवली आहे. गुजरातमध्ये महिलेची हेरगिरी करण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या वापराच्या मुद्द्यावर भाजप आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करून विरोधकांचा हल्ला परतवून लावण्याची यूपीएची तयारी आहे.