आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliamentary Board Meeting: Advani Registered His Dissent OVer The Modi\'s 2014 Blue Print

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदींच्या ब्लूप्रिंटवर अडवाणींचा आक्षेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपच्या मिशन 2014 साठी नरेंद्र मोदी यांनी तयार केलेल्या ब्लू प्रिंटवर पक्षात एकमत झाले नाही. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या योजनेवर आक्षेप घेतला. आगामी बैठक 8 जुलै रोजी होणार आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत मोदी प्रचार समितीचे प्रमुख या नात्याने सहभागी झाले होते. मोदी यांनी विविध राज्यांतील पक्षाची रणनीती, उमेदवारांच्या निवडीचे निकष, प्रतिसाद, मतांचे धु्रवीकरण, महत्त्वांच्या नेत्यांची नियुक्ती आदी विषयांवर मत मांडले. प्रचार आराखड्यात काही बदल करून पुन्हा बैठकीत सादर करण्याचे या वेळी ठरले. दरम्यान, अडवाणी शुक्रवारी नागपूरला जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण जुन्या जनसंघाचे कार्यकर्ते आहोत तसेच आपली व भाजपची विचारसरणी एकच असल्याचे स्वामी यांनी भेटीनंतर सांगितले.


नरेंद्र मोदी यांची योजना
1. मागील गोष्टी विसरून भाजपने केवळ जागा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
2. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मतांचे ध्रुवीकरण जागा वाढवण्यासाठी एकमेव पर्याय आहे.
3. विकासाचे गुजरात मॉडेल पुढे केले जावे. कॉँग्रेसच्या अन्य राज्यांतील सरकारवर निशाणा साधावा.
4. विजयी होणा-या उमेदवारांनाच तिकिट दिले जावे. केंद्राच्या धर्तीवर राज्यांची रणनीती असावी.
5. रालोआवर जास्त ऊर्जा खर्च केली जाऊ नये. निवडणुकीनंतर आघाडीचा विचार करावा.


... आणि अडवाणींचा दृष्टिकोन
1. रालोआच्या जागा वाढाव्यात या दृष्टिकोनातून भाजपने विचार करावा. 2004 मध्ये पक्षाने यावर लक्ष दिले नव्हते. मित्रपक्ष पराभूत झाले आणि भाजप सत्तेबाहेर फेकला गेला.
2. ध्रुवीकरणामुळे आपण आणखी अस्पृश्य होऊ. महागाई, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कॉँग्रेसविरुद्ध वातावरण तयार केले जावे.
3. विकासाचे अटल मॉडेल हाच एकमेव पर्याय आहे. गुजरात मॉडेल देशाला माहीत नाही. कॉँग्रेसविरोधावर मुख्य भर असावा.
4. तिकिट वाटपात उमेदवार विश्वासू असला पाहिजे ही पहिली अट. अण्णा हजारे आंदोलनानंतर याची आवश्यकता वाढली.
5. सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाने राज्य कार्यकारिणीवर आपले मत लादू नये.


तीन तास बैठक, पत्रकार परिषदेत मौन
संसदीय मंडळाची बैठक तीन तास चालली. यानंतर सरचिटणीस अनंत कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र,त्यांनी काही मुद्द्यांबाबत मौन बाळगले. ते म्हणाले, बैठकीत उत्तराखंडमध्ये मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शहीद जवानांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय झाला. भाजपने अन्नसुरक्षा अध्यादेश गैर ठरवला. अशा स्थितीत भाजपने या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली होती का, असा सवाल उपस्थित होतो.


मोदींचा पुढील कार्यक्रम ठरला
बैठकीमध्ये मोदी यांच्या पुढील कार्यक्रमावर चर्चा झाली. ते बिहारमधील पक्ष कार्यकर्त्यांशी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यानंतर 16 जुलै रोजी ते पुरीच्या रथयात्रेत सहभागी होणार आहेत. 1 ऑगस्ट रोजी त्यांचा आंध्र प्रदेश दौरा आहे.