आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमांच्या राजीनाम्यावरून गोंधळ, लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळातच सरला. दोन्ही सभागृहांत ललित मोदी प्रकरणी विरोधक आक्रमक झाले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्यावर अडलेल्या विरोधकांमुळे प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहरातही कामकाज होऊ शकले नाही. दरम्यान, सरकारनेही यावर थोडी नरमाईची भूमिका घेत चर्चेची तयारी असल्याचे जाहीर केले.

राज्यसभेत सकाळी कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी ललित मोदी प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी मागितली. आनंद शर्मा यांनी नियम २६७ नुसार हा प्रस्ताव मांडण्याबाबत नोटीस दिली. सोबत सरकारवर जोरदार हल्ला केला. या सरकारने नैतिकतेच्या सर्व सीमा ओलांडल्या असल्याचे ते म्हणाले. यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हस्तक्षेप करून सरकारची चर्चेची तयारी असल्याचे जाहीर केले. सुषमा स्वराज स्वत: यावर उत्तर देतील, असेही ते म्हणाले. लोकसभा सदस्य दिलीपसिंह भुरिया यांच्यासह लोकसभेच्या १३ माजी सदस्यांचे नुकतेच निधन झाले. या सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून लोकसभेचे कामकाज मंगळवारी सुरू झाले. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही दोन वेळा तहकूब झाले. मात्र, दिवसभर याच मुद्यावरून सभागृहात गोंधळ सुरू होता.
आनंद शर्मा यांचा सरकारवर घणाघात
गेल्या डिसेंबरमध्ये जेटली यांनी आणि नंतर मार्चमध्ये अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ललित मोदीविरुद्ध १४ खटले सुरू असल्याचे म्हटले होते. त्यांच्याविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आल्याचेही सांगण्यात आले हाेते. तरीही ललित मोदी देश सोडून जाण्यात कसे यशस्वी झाले, असा प्रश्न आनंद शर्मांनी केला. उपस्थित केला.
पंतप्रधानांनीच खुलासा करावा
राज्यसभेत काँग्रेस सदस्य आक्रमक होऊन ललित मोदी मुद्दा मांडत होते. यादरम्यान सभागृहाचे कामकाज दोन वेळा दीर्घकाळासाठी तहकूब करावे लागले. ललित मोदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी दिवसभर लावून धरली.
मोदींसाठी मानवता आली कोठून?
केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच महिन्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना मानवीय दृष्टिकोनातून विचार करता ब्रिटन सोडण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्या देशाला केली होती. घोटाळेबाज व्यक्तीसाठी सरकारने ही विनंती केलीच कशी, असे शर्मा म्हणाले. त्यांना काँग्रेस सदस्यांनीही जोरदार पाठिंबा दिला.
होय मी चर्चेस तयार...
मी आजही चर्चेसाठी तयार आहे. तसे मी जेटली यांनाही कळवले आहे. सभागृहाला ही माहिती देण्यास मी सांगितले आहे. यावर विरोधी पक्षांची काय भूमिका आहे, याच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत... सुषमा स्वराज यांचे ट्विट
बातम्या आणखी आहेत...