आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेत गदारोळ : राज्यसभेत सभापतींचा माइक तोडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील अखेरचा दिवस गोंधळातच संपला. श्रीलंकेतील तामिळींवर अत्याचाराच्या मुद्द्यावर सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप करून द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या खासदारांनी गदारोळ केला. या खासदारांनी सभापतींचा माइकही तोडला.अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आता 22 एप्रिल ते 10 मेपर्यंत होणार आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत शुक्रवारी कामकाज सुरू होताच द्रमुक-अण्णाद्रमुकच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांतील प्रश्नोत्तराचा तासच झाला नाही. राज्यसभेत उपाहारानंतर द्रमुक सदस्यांनी तालिका सभापती रेणुका चौधरी यांच्या आसनासमोर ठिय्या दिला. भाजपचे सदस्य पुरुषोत्तम रूपाला हे खासगी विधेयक मांडण्याचा प्रयत्न करताच अण्णाद्रमुकचे व्ही. मैत्रेयन यांनी त्यांच्या हातून कागद हिसकावून फाडून टाकला. काही खासदारांसोबत सभापतींच्या आसनाजवळ आले. त्यांनी टेबलावरून सर्व कागद फेकून दिले. चौधरी यांनी बोलण्याचा प्रयत्न करताच त्यांनी चार पैकी दोन माइक उखडून टाकले. त्यानंतर चौधरी यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभर तहकूब केले.

रेणुकांची माफी- सभागृह तहकूब झाल्यानंतर रेणुका चौधरी यांनी द्रमुक सदस्यांना टोमणा मारला व त्या बाहेर निघून गेल्या. यामुळे तिरूची शिवा हे सदस्य भडकले. ते कामकाज संपल्यानंतरही जोरात घोषणाबाजी करीत राहिले. अखेर रेणुका चौधरींनी त्यांची माफी मागितली.

दबाव नाही- श्रीलंकाविरोधातील ठरावात दुरुस्ती करण्यासाठी दबाव टाकण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सरकारने दबाव टाकला नाही. हा श्रीलंकेतील तामिळींचा विश्वासघात आहे, असा आरोप मैत्रेयन यांनी केला. मनमोहनसिंग यांनी सभागृहात याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.

अन्न सुरक्षा विधेयक लटकले- सरकारचे महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयक लटकले आहे. लोकसभेत शुक्रवारी ते सादर केले जाणार होते, पण गदारोळामुळे विधेयक पटलावर आलेच नाही.