आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Party's Splited Again In One Month On Land Bill Issue

भूसंपादन : भाजपविरोधात एकवटलेली विविध पक्षांची आघाडी महिनाभरातच तुटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भूसंपादनाच्या मुद्द्यावर राजधानीत १९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या "किसान रॅली'साठी कोणत्याही अन्य पक्षांच्या नेत्यांना बोलावले जाणार नाही, असे काँग्रेसकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भूसंपादन विधेयकप्रकरणी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी एकत्रित आलेल्या १० पक्षांची आघाडी महिनाभरही तग धरू शकली नाही.
संबंधित दहाही पक्षांना एकत्रित आणण्यासाठी जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी पुढाकार घेतला होता. १५ मार्च रोजी राष्ट्रपती भवनावर मोर्चा नेण्यासाठी ९ पक्षांच्या खासदारांना त्यांनी यासाठी राजी केले होते. मात्र, त्यानंतर काँग्रेसही या मोर्चात सहभागी झाली. त्यानंतर १७ मार्च रोजी पक्षांनी राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला. यात १०० खासदार सहभागी झाले होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या मोर्चाच्या नेतृत्वाच्या संघात सामील होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोर्चात सहभागी झालेले सर्व पक्ष विधेयकाविरोधातील संघर्षात एकत्र असतील अशी होकारघंटा सर्वच पक्षांकडून देण्यात आली होती; परंतु त्यानंतर काहीच दिवसांची काँग्रेसने स्वतंत्र बाजू घेत सभेची घोषणा केली. इतके होऊनही या मुद्द्यावर एकता दाखवण्यासाठी विधेयकास विरोध दर्शवणाऱ्या प्रमुख पक्षांना तरी किमान बोलावले जाईल, अशी अपेक्षा जदयू व डाव्या पक्षांना होती; परंतु काँग्रेसकडून याची अद्याप काहीच दखल घेण्यात आलेली नाही.

आंदोलनात सहभागी झालेले पक्ष
काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस, भाकप, माकप, जदयू, राजद, जनता दल युनायटेड सेक्युलर, राष्ट्रवादी काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल व आम आदमी पक्षाचा या आघाडीत समावेश होता.

किसान रॅलीला राहुल गांधी मार्गदर्शन करतील : अँटनी
नवी दिल्ली | सुमारे दोन महिन्यांपासून रजेवर असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी १९ एप्रिल रोजी दिल्लीत काँग्रेसकडून आयोजित किसान रॅलीला संबोधित करतील, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी सांगितली आहे. अर्थसंकल्पाच्या आधीपासूनच राहुल गांधी रजेवर गेलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांकडून काँग्रेसवर भडिमार सुरू होता. याच आठवड्यात ते परत येणार असल्याची माहिती आहे.