आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-बीडमध्ये सुरु होणार पासपोर्ट केंद्र, आता मुंबई-नागपूरच्या वाऱ्या बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / औरंगाबाद- पर्यटनाची राजधानी असलेल्या व औद्योगिक दृष्ट्या वेगाने विकसीत होणार्‍या औरंगाबाद शहरात पुन्हा पासपोर्ट कार्यालय सुरु होणार आहे. याची घोषणा केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी केली. मराठवाड्यात औरंगाबाद आणि बीड येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार आहे. यामुळे मराठवाड्यातील नागरीकांना आता मुंबई किंवा नागपूरच्या खेट्या माराव्या लागणार नाही. विविध राजकीय पक्ष, संघटनांची अनेक दिवसांपासून ही मागणी होती.
 
मराठवाड्याची 1 कोटी 87 लाख लोकसंख्या असून पासपोर्ट काढण्यासाठी औरंगाबाद, बीड जिल्ह्यातील नागरीकांना मुंबई तर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरीकांना नागपूरला जावे लागते. तिथे जाऊन कागदपत्रांमध्ये काही त्रुटी राहिल्यास पुन्हा खेटे घालावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. औरंगाबाद शहराच्या परिसरात येत्या काळात महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्प येऊ घातला आहे. तसेच केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शंभर स्मार्ट सिटीत औरंगाबादचा समावेश केल्याने शहराच्या विकासात आणखीनच भर पडणार असल्याने येथे पासपोर्ट कार्यालय गरजचे असल्याचे लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल सुषमा स्वराज यांनी घेतली आहे.  
व्यापार, उद्योग, शिक्षण, पर्यटन आदींचा विचार करता मराठवाड्यातून परदेशी जाणार्‍या नागरीकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातून बहुसंख्य अल्पसंख्यांक समाज हा हज यात्रेसाठी जात असल्याने त्यांना देखील पासपोर्टची आवश्यकता लागते. मात्र औरंगाबाद शहरातील पासपोर्ट कार्यालय बंद झाल्याने त्यांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबई, नागपूर याठिकाणी जावे लागत होते. यासाठी त्यांना 600 ते 800 किलो मीटरचा प्रवास करावा लागत होता. एवढे करूनही त्यात काही त्रुटी असल्यास नागरीकांना पुन्हा दुसर्‍यांदा त्याठिकाणी जावे लागत होते. यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड तर सोसावा लागत होताच शिवाय वेळ देखील वाया जात होता. काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाचे पथक औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी छावणी पोस्ट ऑफिसची पाहाणी करुन पासपोर्ट कार्यालयासाठी हे ठिकाण योग्य असल्याचे म्हटले होते. त्यामुळे छावणी पोस्ट ऑफिस येथे नव्याने पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होण्याची शक्यता आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...