Home »National »Delhi» PDP MLA Driver Detained In Connection With Amarnath Terror Attack

परकीय शक्तींमुळे काश्मीरात लढाई, आता चीनही सामील : मेहबूबा मुफ्तींनी केला आरोप

दिव्य मराठी नेटवर्क | Jul 16, 2017, 00:46 AM IST

  • जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत जम्मू-काश्मीरमधील स्थितीबाबत चर्चा केली.
नवी दिल्ली / श्रीनगर -जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामागे चीनचा हस्तक्षेप वाढला आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही समस्या नाही. ही लढाई परकीय शक्तींमुळे घडून येत आहे, असे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी सांगितले.
काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळेच बाहेरून दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली आहे. आता तर चीननेदेखील अशा कारवायांना खतपाणी घालण्याचे काम सुरू केले आहे, असा दावा मेहबूबा यांनी केला. आतापर्यंत राज्यातील परिस्थितीला पाकिस्तानला जबाबदार मानले जात होते. परंतु मेहबूबा यांनी चीनवर थेट आरोप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मेहबूबा शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीसाठी दिल्लीत आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मेहबूबा बोलत होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मेहबूबा यांनी या बैठकीत काश्मीरमधील परिस्थितीची माहिती दिली. सिक्कीमच्या डोकलाममध्ये भारत आणि चीन सैन्यादरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मेहबूबा यांचे वक्तव्य जारी झाले आहे. डोकलाममधील परिस्थिती जैसे-थे ठेवण्याऐवजी चीनने सीमेवर ती ताणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे काश्मीरच्या पुलवामा, कुलगाम, शोपियां व अनंतनाग या चार जिल्ह्यांत तणाव कायम आहे.
बुखारींनी शरीफ यांना लिहिले पत्र
जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्र पाठवले आहे. हुर्रियत नेत्यांना समजावून सांगावे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारलाही पत्र लिहून शांततेसाठी योग्य ती पावले उचलावीत, असे आवाहन केले. दहशतवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, असे आवाहनही केले. जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पत्र पाठवले आहे. हुर्रियत नेत्यांना समजावून सांगावे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
प्रवाशांची हत्या करून दंगलीचा प्रयत्न
अमरनाथच्या प्रवाशांवर हल्ले करून सांप्रदायिक दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे. बाह्य शक्तींच्या विरोधात संपूर्ण देश व राजकीय पक्ष एकजूट दाखवत नाहीत, तोपर्यंत आपला विजय होऊ शकत नाही. देशात राजकीय एकजूट दिसू लागली आहे. हे पाहून मला आनंद वाटला, असे मेहबूबा यांनी म्हटले आहे.

Next Article

Recommended