आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्यांना दिलासा : पेट्रोलच्या दरात दोन रुपये कपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल लिटरमागे दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरकपात लागू झाली आहे. यात स्थानिक कर आणि व्हॅटचा समावेश नाही. गेल्या नऊ महिन्यांत पेट्रोलच्या दरातील ही सर्वात मोठी कपात आहे. विशेष म्हणजे पेट्रोलियम कंपन्यांनी डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

व्हॅटनंतर दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 2.40 रुपयांनी स्वस्त झाले आहे. येथे आता पेट्रोलचे दर प्रतिलिटर 67.34 रुपये झाले आहेत. तेल कंपन्यांनी यापूर्वी 16 फेब्रुवारीला दीड रुपया तर 2 मार्च रोजी 1.40 रुपयाने पेट्रोल दरवाढ केली होती.

तेल कंपन्यांकडून डिझेलच्या दरात दरमहा 40 ते 50 पैशांची वाढ केली जाण्याची शक्यता होती. मात्र तूर्तास ती टळली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे ही दरकपात करण्यात येत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. डिझेलवरील नुकसानही कमी झाले आहे. इंडियन ऑइल कॉर्पाेरेशननुसार (आयओसी) मार्च महिन्याच्या सुरुवातीस प्रतिलिटर डिझेलवर 11.26 रुपयांचा तोटा होत होता. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे तो आता 8.64 रुपयांवर आला आहे.