आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pharmacitical Companies Took Back Stents From The Market As The Govrment Limit The Cost

दरमर्यादा येताच अद्ययावत स्टेंट रुग्णालयांमधून गायब, बाजारातूनही परत मागवण्‍यात आल्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलेबलिंग करण्याचे कारण दाखवत नव्या तंत्राच्या स्टेंट कंपन्यांनी बाजारातून काढून घेतल्या आहेत. - Divya Marathi
रिलेबलिंग करण्याचे कारण दाखवत नव्या तंत्राच्या स्टेंट कंपन्यांनी बाजारातून काढून घेतल्या आहेत.
नवी दिल्ली - हृदयविकारात अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या स्टेंटच्या किमतीवर सरकारने नियंत्रण आणल्यानंतर  स्टेंटचा तुटवडा जाणवत आहे. काही कंपन्या स्टेंटचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत. त्यांच्यावर सरकारचे बारीक लक्ष असून, अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने शुक्रवारी दिला. दरम्यान, रिलेबलिंग करण्यासाठी स्टेंट परत मागवत असल्याची माहिती बहुतांश कंपन्यांनी, रुग्णालयांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए), १३ फेब्रुवारी रोजी धातूच्या स्टेंटच्या किमती ७२६० रुपये तर औषधी रसायन (ड्रगएल्युटिंग) लावलेल्या व विरघळणाऱ्या (बायोअॅब्झॉर्बल) स्टेंटच्या किमती २९,६०० रुपयांपर्यंत मर्यादित केल्या. सरकारने स्टेंटच्या किमतीत ८५ टक्क्यांपर्यंत कपात केल्याने रुग्णांना दिलासा मिळाला.
 
मात्र त्यानंतर राज्यातील काही रुग्णालयांत स्टेंटचा तुटवडा जाणवत असल्याचे औषधीनिर्माण विभागाच्या निदर्शनास आले. या विभागाने याची माहिती एनपीपीए तसेच आरोग्य मंत्रालयाला दिली व यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे सुचवले. औषधी किंमत नियंत्रण कायदा, २०१३ नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे औषधी सचिव जय प्रिय प्रकाश यांनी सांगितले. 

कॅथलॅबचा खर्चही कमी करावा,अकोल्यात मागणी: स्टेंटच्या किमती कमी झाल्याने अँजिआेप्लास्टी करणाऱ्या रुग्णांना ३० टक्के फायदा होईल. परंतु यामध्ये मुख्य अडचण ठरते ती कॅथलॅबची. लॅबची किंमत ४ कोटी रुपये आहे. लॅबला चोवीस तास वीज लागते. स्टेंट स्वस्त वापरली तरी कॅथलॅबचा अंतर्गत खर्च बराच आहे. त्यावर  नियंत्रण आणण्यासाठी केंद्राने पुढाकार घेण्याची गरज आहे. स्टेंटसाठी वापरला जाणारा बलून, वायर यांच्या किमतीवर बंधने नाहीत. बहुतांश साहित्य विदेशी वापरले जाते. त्यामुळेही खर्च वाढतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जळगाव : बहुतांश स्टेंट परत  
जळगावातील गाेदावरी हाॅस्पिटलतर्फे वापरण्यात येणाऱ्या स्टेंट पुरवणाऱ्या कंपनीने अद्याप शिल्लक साठा परत मागवलेला नाही. येथे प्रामुख्याने राजीव गांधी याेजनेंतर्गत या शस्त्रक्रिया हाेतात. सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल असलेल्या अाॅर्किड हाॅस्पिटलमध्ये महिन्याला २५ ते ३० शस्त्रक्रिया हाेतात. पुरवठादार कंपन्यांनी शुक्रवारीच स्टेंट परत नेल्या असल्याचे डाॅ. परेश दाेषी यांनी सांगितले. गणपती हाॅस्पिटलमध्ये महिन्याला ८० ते ९० शस्त्रक्रिया हाेतात.
 
कंपन्यांनी येथील शिल्लक स्टेंट परत घेणार असल्याचे कळवल्याचे डाॅ. शीतल अाेसवाल यांनी सांगितले. डाॅ. मिलिंद वायकाेळे व डाॅ. विवेक चाैधरी या दाेघा डाॅक्टरांच्या महिन्याला चार ते पाच शस्त्रक्रिया हाेतात. दाेन, तीन स्टेंट शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. त्या अागामी पुरवठा करताना त्या बदलून मिळणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात अाले अाहे.

नेमके काय झाले
- सरकारने १३ फेब्रुवारीपासून हृदयविकारासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या स्टेंटच्या कमाल किमतीवर नियंत्रण आणले.
- पूर्वी २५,००० रुपये ते १.९८ लाख रुपये किमतीने या स्टेंटची विक्री व्हायची.
- सरकारने या किमती ७२६० ते २९६०० रुपयांपर्यंत मर्यादित केल्या.
- त्यामुळे काही स्टेंट निर्मात्या कंपन्या, वितरक, आयातदारांनी रिलेबलिंगच्या नावावर रुग्णालयातून स्टेंट परत घेतल्या. यामुळे स्टेंटची कृत्रिम टंचाई निर्माण झाली.

...तर रुग्णालये, कंपन्यांचा परवाना रद्द : अनंतकुमार
देशात सुमारे सहा कोटी लोकांना हृदयविकार असून दरवर्षी पाच लाख हृदय शस्त्रक्रिया होतात, हे ध्यानात घेऊन सरकारने स्टेंटच्या किंमती खूप कमी केल्या आहेत. मात्र, रुग्णांना स्वस्तात स्टेंट उपलब्ध करून न दिल्यास संबंधित रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करेन व त्यांचा परवानाही रद्द करेन, असा इशारा केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी मुंबईत दिला.
 
ते म्हणाले, सरकारने गेल्या अडीच वर्षात १४५० औषधांच्या किंमती नियंत्रणात आणल्या असून त्यामुळे रुग्णांची पाच हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. आता स्टेंटच्या किमतींवर नियंत्रण आणले आहे. त्यामुळे ४५ ते ६०  हजार रुपयांची स्टेंट आता ७५०० रुपयांना मिळेल, तर २ लाख रुपयांची स्टेंट ३० हजार रुपयांना मिळेल. रुग्णालयांनी स्वस्तात स्टेंट उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यांनी स्टेंटची जादा किंमत आकारली तर वाढीव रक्कम वसूल करणे, फौजदारी कारवाई करणे व रुग्णालयाचा परवाना रद्द करणे या उपायांचा अवलंब होईल.
 
स्टेंटची आयात अथवा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांच्या प्रमाणातील आयात अथवा निर्मिती पुढील एक वर्ष चालू ठेवणे आवश्यक आहे. किंमत कमी झाली म्हणून आयात अथवा निर्मिती थांबवली तर त्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, याकडेही केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष वेधले. जेनेरिक औषधांची एक हजार दुकाने सुरू करण्याच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होईल.

 गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अडचणीत 
अॅब्यूट, मेट्राॅनिक, बाेस्टल या तीन विदेशी कंपन्यांच्या स्टेंट बाजारात असून त्यांनी सरकारच्या निर्णयानंतर तात्काळ सर्वच रुग्णालयांकडे राखीव असलेल्या स्टेंटचा साठा परत मागविला अाहे. कंपन्यांकडून या स्टेट कमी किमतीत देणे शक्य नसल्याचे सांगत जुन्या तंत्रज्ञानाच्या कमी किमतीतील स्टेंट उपलब्ध करून दिल्या जात अाहेत.
 
यामुळे  गुंतागुंतीच्या अँजिअाेप्लास्टीसाठी लाख ते दीड लाखाच्या किमतीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या स्टेंट वापरून रुग्णावर उपचार करणे शक्य हाेते. मात्र, अाता या स्टेंट उपलब्ध नसल्याने अवघड झाले आहे. अशा रुग्णांवर अाता बायपासच शस्त्रक्रिया कराव्या लागतील. सरकारने कंपन्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घ्यायला हवे हाेते -  डाॅ. शीतलकुमार हिरण व   डाॅ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नाशिक.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, परत मागवण्यात आलेल्या स्टेंट, सध्या उपलब्ध असलेल्या स्टेंट आणि देशातील रुग्णांची विदेशात अाेढ 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...