आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photography Means Sin, Darool Ulam Devband New Fatwa

‘फोटोग्राफी’ म्हणजे पाप, दारूल उलूम देवबंदचा नवा फतवा जारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सौदी अरेबियात पवित्र मक्केमध्ये छायाचित्रकारांना प्रवेश दिला जातो आणि जगभरातील इस्लामिक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ‘नमाज’चे थेट प्रक्षेपणही केले जात असताना भारतातील दारूल उलूम या आघाडीच्या मदरशाने फोटोग्राफी इस्लामच्या दृष्टीने बेकायदेशीर आणि पाप असल्याचा फतवा जारी केला आहे.


दारूल उलूम देवबंदचे मोहतमीम (कुलगुरू) मुफ्ती अब्दुल कासीम नोमानी यांनी ‘फोटोग्राफी’ गैरइस्लामिक असल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेला दूरध्वनीवरून सांगितले. ओळखपत्र किंवा पासपोर्टखेरीज मुस्लिमांना फोटो काढण्याची परवानगी नाही. लग्न समारंभांचे व्हिडिओ चित्रीकरण किंवा छायाचित्रे काढून भावी पिढ्यांसाठी हे क्षण जपून ठेवण्याची परवानगी इस्लाम देत नाही, असे नोमानी म्हणाले.


इस्लामच्या मूलभूत तत्त्वाची शिकवण देणा-या सर्वात जुन्या वहाबी मदरशाची शिकवण आचरणात आणणा-या सौदी अरेबिया पवित्र मक्का शहरात छायचित्रे काढण्यास परवानगी देते आणि वर्षभर तेथील नमाजाचे थेट प्रक्षेपणही करण्याची परवानगी देते, असे लक्षात आणून दिले असता नोमानी म्हणाले की, त्यांना ते खुशाल करू द्या. आम्ही मात्र त्याला परवानगी देणार नाही. ते करतात ती प्रत्येक गोष्ट योग्य नाही.


अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दारूल उलूमने हा फतवा जारी केला आहे. कॅमे-यासमोर जाणे इस्लामच्या विरोधात आहे काय, असा प्रश्न दूरचित्रवाणीच्या एका पत्रकाराने विचारल्यानंतरही असाच फतवा काढण्यात आला होता. ‘अगदी बरोबर आहे. स्वत:चे छायाचित्र काढून घेणे किंवा दुस-याचे छायाचित्र काढण्यावर इस्लाममध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अल्लाहकडे क्षमायाचना करा आणि इस्लामने प्रतिबंध न घातलेल्या क्षेत्रात नोकरी करा,’ असे या फतव्यात म्हटले होते.


का काढला फतवा ?
अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने आपणास फोटोग्राफीमध्ये प्रचंड रस असून त्यातच करिअर करण्याची इच्छा असल्याचे सांगत देवबंदच्या दारूल इफ्ताला प्रश्न विचारला होता. त्यावर हा फतवा जारी करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम करू नका. अभियांत्रिकी अभ्यासक्रमावर आधारित अन्य कोणतीही नोकरी शोधा’ असे दारूल इफ्ताच्या वेबसाइटवर टाकण्यात आलेल्या फतव्यात नमूद करण्यात आले आहे.


शियांची मात्र परवानगी
आमच्या पंथात फोटोग्राफी आणि टीव्ही पाहण्यास परवानगी आहे. पीस टीव्ही, ओटीव्ही, हजमधील नमाजाचे थेट प्रक्षेपण... हे सगळेच चुकीचे कसे काय असू शकते? फोटोग्राफी करण्यात काहीही गैर नसल्याचे मी माझ्या सुन्नी सहका-यांना सांगेन, असे शिया चंद समितीचे अध्यक्ष मुफ्ती सैफ अब्बास यांनी म्हटले आहे.