आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Planning Commission News In Marathi, Narendra Modi, Divya Marathi

नियोजन आयोगाऐवजी संस्थेसाठी मोदींनी जनतेची मते मागवली, संकेतस्थळ तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नियोजन आयोग गुंडाळून त्याऐवजी आधुनिक संस्थेची स्थापना करण्याच्या दिशेने मोदी सरकारने मंगळवारी पहिले पाऊल टाकले. ही नवी संस्था कशी असावी, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची मते मागवली असून यासाठी mygov.nic.in या वेबसाइटवर खुले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. उत्कृष्ट कल्पना मांडणा-यांना बक्षीसही दिले जाणार आहे.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना मोदींनी 64 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या नियोजन आयोगाचे स्वरूप लवकरच बदलण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 21 व्या शतकातील आर्थिक आव्हाने पेलण्यासाठी आणि भारताची संघराज्य रचना अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यांचा या प्रक्रियेत सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने अशी पावले महत्त्वाची आहेत.

बदलता काळ, बदलती धोरणे
सध्या देशातील अंतर्गत परिस्थिती आणि जागतिक स्थिती पण बदलली आहे. आता सरकार हे आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र राहिलेले नाही. अर्थव्यवस्था बहुआयामी बनली आहे. त्यामुळे नियोजन आयोगाचेही रुपडे बदलणार आहे.

राज्य सरकारेही महत्त्वाची
राज्य सरकारेही आज विकासाची केंद्र आहेत. हे एक चांगले लक्षण असल्याचे मोदींनी म्हटले होते. भारत विकासाच्या मार्गावर असेल तर राज्यांनाही या वाटेवर आणले पाहिजे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली होती.

नवा आकार, नवे रूप : नियोजन आयोगाच्या नव्या रूपासाठी विचार करावा लागेल. या आयोगाची जागा लवकरच नवीन संस्था घेईल. तत्कालीन परिस्थितीनुसार त्या काळातील गरजा भागवण्यासाठी नियोजन आयोग स्थापन करण्यात आला होता. देशाच्या विकासात या आयोगाने काळानुरूप योगदानही दिले, असे वक्तव्यात नमूद आहे.

नियोजन आयोग मोडीत काढण्याची किंमत चुकवावी लागेल : मुख्यमंत्री
मुंबई ।नियोजन आयोगाऐवजी नवी संस्था स्थापन करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी टीका केली.
नियोजन आयोग मोडीत काढून आर्थिक विषय मुक्त अर्थव्यवस्थेकडे हस्तांतरित करणे धोकादायक आहे. नियोजन आयोग मोडीत काढण्याची किंमत देशाला चुकवावी लागेल, असे मत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर व्यक्त केले. मोदी यांनी नियोजन आयोगाऐवजी अस्तित्वात येणारी संस्था कशी असावी, असे ट्विट मंगळवारी टाकले होते. त्यावर प्रतिक्रिया म्हणून चव्हाण यांनी हे मत व्यक्त केले.