आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Manmohan Singh For A Mechanism To Provide Risk Insurance

आपत्तींसाठी जोखीम विमा;पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे सूतोवाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी जोखीम विमा देण्याचे सूतोवाच केले आहे. नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांना त्वरित दिलासा देण्यासाठी आकस्मिक कर्ज सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे.
पंतप्रधान म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना त्वरित मदत देण्यावर लक्ष दिले जावे. त्वरित मदत मिळाल्यास नागरिकांना नैसर्गिक आपत्तीतून लवकर बाहेर पडता येईल. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सध्या राष्ट्रीय स्तरावर पुरेशी व्यवस्था नाही. यामध्ये जोखीम विमा आणि आकस्मिक कर्ज सुविधा दिली जात नाही. नव्या रचनेमध्ये तत्काळ निधी उपलब्ध करून दिल्यास आपत्तीग्रस्तांना सावरण्यास मदत मिळेल. आपत्ती व्यवस्थापन जटिल प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत केंद्र, राज्य सरकारसोबत स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचा समावेश असतो.आपत्ती निवारण व नैसर्गिक आपत्तीतून होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी यात भरपूर काम करावयाचे आहे, असे पंतप्रधानांनी आपत्ती जोखमीत घट आणण्यासाठी राष्ट्रीय मंच या विषयावरील परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते.

निसर्ग व मानवनिर्मित संकटातून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रहिताच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे. भूकंप, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूस्खलन आणि औद्योगिक अपघातांचा या आपत्तीत समावेश आहे.

गेल्या काही वर्षांत वातावरण बदलामुळे आपत्ती व्यवस्थापनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. पूर, चक्रीवादळ आणि दुष्काळाच्या निमित्ताने या संकटांचा सामना करावा लागत आहे. वातावरण बदलामुळे भविष्यात आपत्ती व्यवस्थापन आणखी कठिण होईल. त्यामुळे या विषयाला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये समग्र दृष्टिकोन अंगीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीपासून केंद्र सरकारपर्यंत संस्थात्मक कार्यपद्धती अवलंबली जावी, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मंचाची स्थापना केली आहे. त्याची ही पहिलीच परिषद होती.

मनरेगात दुष्काळ निवारण
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत दुष्काळ निवारण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. आपत्ती जोखमेत कमतरता आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तेवढेच योगदान देणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा संपूर्ण वापर करत आहोत.

भारत जगात आठवा
आपत्ती जोखीम व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय मंच स्थापन केल्याबद्दल पंतप्रधानांनी गृहमंत्रालयाची प्रशंसा केली. या विषयावर राष्ट्रीय मंच स्थापन करणारा जगातील आठवा देश ठरला आहे.

नैसर्गिक संकटांबाबतच्या इशारा प्रणालीवर भर
बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपत्ती जोखमेत घट आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये इशारा प्रणाली आणि संचार सुविधेचा समावेश आहे. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला.