आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Modi Asks Industry To Take Risk, Invest; India Inc Wants Rate Cut

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणूक वाढवा, जोखीम घेण्यास घाबरू नका : पंतप्रधानाचे आव्‍हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सध्या जागतिक अर्थक्षेत्रात घसरणीचे मंदीसदृश वातावरण आहे. भारताचा आर्थिक विकास वाढवण्याची ही मोठी संधी असून उद्योजकांनी जाखीम घेत गुंतवणूक वाढवावी, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

जागतिक आर्थिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातील आघाडीचे उद्योजक, बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांची बैठक आयोजित केली होती. तीत पंतप्रधानांनी उद्योजकांना गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले. चीनमधील घसरती आर्थिक स्थिती, जगभरात ढासळणाऱ्या जिनसांच्या (कमोडिटी) किमती, इज ऑफ डुइंग बिझनेस, जीएसटी, महागडे भांडवल व कर्ज आणि कृषी क्षेत्राचा विकास अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी कमी खर्चात उत्पादनावर भर देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था निव्वळ निर्यातीवर अवलंबून नाही. येथे निर्मिती व उत्पादनाला मोठा वाव आहे. मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. सध्याच्या जागतिक स्थितीत भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आहे. त्यामुळे थोडी जोखीम घेऊन गुंतवणूक करण्यास उद्योजकांनी पुढाकार घ्यावा.
कर्जाचा विषय रिझर्व्ह बँकेचा : जेटली
पंतप्रधानाच्या आवाहनावर उद्योजकांनी कर्ज स्वस्त करण्याची मागणी केली. त्यावर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हा विषय रिझर्व्ह बँकेचा असल्याचे सांगून चेंडू राजन यांच्याकडे ढकलला. अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे जेटली यांनी सांगितले.

दिग्गजांची उपस्थिती
बैठकीला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन,रिलायन्स समूहाचे एमडी मुकेश अंबानी, टाटा समूहाचे सायरस मिस्त्री, आदित्य बिर्ला समूहाचे कुमार मंगलम बिर्ला, आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर, गेलचे चेअरमन बी.सी. त्रिपाठी,भेलचे प्रमुख बी. प्रसाद, एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, अर्थतज्ज्ञ अजित रानडे, जहांगीर अझिझ, सुबीर गोकर्ण आदींसह सरकारचे अर्थविषयक उच्चपदस्थांची उपस्थिती होती.
कर्ज स्वस्त करा : उद्योजकांची मागणी
कर्ज स्वस्त करा, रोजगारावरचा खर्च कमी करण्याची मागणी उद्योजकांनी केली. अर्थव्यवस्थेला गती देणे, इझ ऑफ डुइंग बिझनेस सुधारण्यासाठी सरकारने पावले टाकावी, असे सुचवले. फिक्कीच्या अध्यक्ष ज्योत्स्ना सुरी म्हणाल्या, भांडवल स्वस्त केले तर देशातील गुंतवणुकीला चालना मिळेल. स्टार्ट अपसाठी प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. पायाभूत क्षेत्राकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे कर्ज स्वस्ताई आवश्यक आहे. सीआयआयचे अध्यक्ष सुमित मुझुमदार व असोचेमचे अध्यक्ष राणा कपूर यांनी कर्ज पुरवठा वाढीकडे लक्ष देण्याच्या मुद्द्यावर भर दिला.