नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या टीममध्ये पुढच्या आठवड्यात फेरबदल करू शकतात. केंद्र सरकारने राष्ट्रपती भवनाकडे १९ ते २३ जूनदरम्यान राष्ट्रपतींच्या उपलब्धतेबाबत माहिती मागितली आहे. त्यानंतर कॅबिनेटमधील फेरबदलाच्या चर्चेने वेग घेतला आहे.
कॅबिनेटमध्ये चार नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता असून नुकतेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर नुकतेच निवडून गेलेले भाजप नेते विनय सहस्रबुद्धे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अापली वर्णी लागावी म्हणून महाराष्ट्रातून भाजपच्या अनेक खासदारांनी प्रयत्न चालवले अाहेत. त्यात दिलीप गांधी, हरिश्चंद्र चव्हाण, संजय धाेत्रे, ए. टी. नाना पाटील हे प्रयत्न करणाऱ्यांत अग्रक्रमावर अाहेत; परंतु या फेरबदलात महाराष्ट्राला एखादेच मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून त्यात विनय सहस्रबुद्धे यांचे नाव आघाडीवर आहे. गाेपीनाथ मुंडे हे ग्रामविकासमंत्री हाेते. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या वाट्याचे कॅबिनेट मंत्रिपद रिक्त हाेते. प्रभूंना शिवसेनेतून भाजपमध्ये अाणून राज्याला हे पद देण्यात अाले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष झाल्याने रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्या ठिकाणी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार अाहे.
माेदींच्या मंत्रिमंडळात सध्या ६६ मंत्री अाहेत. त्यात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर, पीयूष गाेयल, हंसराज अहिर अाणि शिवसेनेचे अनंत गिते यांचा समावेश अाहे. अहिर अाणि गितेवगळता सगळ्यांनीच अापल्या कामात ठसा उमटवला अाहे. चांगले मंत्री म्हणून त्यांनी ख्यातीही मिळवली अाहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांची संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत आरएसएसच्या नेत्यांशी चर्चाही झालेली आहे. सरसंघचालकांनी त्या नावांवर सहमतीही दर्शवली आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री बनल्यामुळे सर्वानंद सोनोवाल यांच्या राजीनाम्यामुळे एक पद रिक्त झाले आहे. ते भरण्याबरोबरच आसाममधील विजयाचे बक्षीस म्हणून तेथून आणखी एक जण कॅबिनेटमध्ये येऊ शकतो. दिब्रुगडचे रामेश्वर तेली आणि रमेन डेका ही कॅबिनेटमध्ये येण्याची शक्यता असलेल्या आसाममधील दोन खासदारांची नावे आहेत. रामेश्वर तेली सोनोवाल यांची जागा घेऊ शकतात. कॅबिनेटमध्ये सोनोवाल क्रीडा युवक मंत्रालय सांभाळत होते.
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता उत्तर प्रदेशला प्राधान्य देत प्रतिनिधित्व वाढवले जाऊ शकते. अलाहाबादचे खासदार श्यामचरण गुप्तांना मंत्रिपद मिळेल, असा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे आणि ओम माथूर, जबलपूरचे खासदार राकेश सिंह, बिकानेरचे खासदार अर्जुन मेघवाल आणि उत्तराखंडचे भगतसिंह कोश्यारी यांच्याही नावांची चर्चा आहे.
पीयूष गोयल, नक्वींना कॅबिनेट? :
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. गोयल यांच्याकडे सध्या ऊर्जा राज्यमंत्र्यांचा स्वतंत्र कार्यभार आहे. अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याने ते पंतप्रधानांच्या गुणवंत मंत्र्यांमध्ये वरच्या स्थानावर अाहेत. गाेयल यांच्या कामगिरीवर खुश हाेऊन माेदींकडून बढतीचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. नक्वींकडे अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्रिपद आहे.
गिरिराज, हेपतुल्लांची सुटी शक्य
सूत्रांच्यामते, केंद्रीय मंत्री बिहारचे भाजप खासदार गिरिराज सिंह यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. गिरिराज सिंह यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकार अनेकदा अडचणीत आलेले आहे. पंचायत राजमंत्री निहालचंद यांचीही खुर्ची धोक्यात आहे. निहालचंद हे एका बलात्कार प्रकरणात कथितरीत्या अडकलेले आहेत. अल्पसंख्याक कल्याण मंत्री नजमा हेपतुल्ला यांचीही सुटी होण्याची शक्यता आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)