आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Declares That No Tax To Start Up For Three Years

स्टार्टअपला ३ वर्षे कुठलाही कर नाही, परवाना सोपा, तपासणीत सूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्यमशीलता वाढवण्यासाठी स्टार्टअपला अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात तीन वर्षांपर्यंत प्राप्तिकर आणि तपासणीतून सूट, स्वयंप्रमाणीकरणाची सुविधा, पेटंट शुल्क कमी करणे, १० हजार कोटींचा निधी स्थापन करणे आणि लायसन्स राजपासून मुक्ती यांचा समावेश आहे. त्यात गुंतवणूक करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत २० टक्के भांडवली लाभ करही द्यावा लागणार नाही.

मोदींनी शनिवारी येथे विज्ञान भवनात आयोजित एका समारंभात ‘स्टार्टअप इंडिया’ मोहिमेचा कृती आराखडा जारी केला. देश-विदेशातील १५०० पेक्षा जास्त स्टार्टअप प्रमुखांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी देशात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडला. स्टार्टअप्ससाठी व्यवसाय सुरू करणे आणि बंद करणे, दोन्हीही सोपे असेल. त्यांना सरकारी खरेदीतही सवलत मिळेल.

मोदी म्हणाले की,‘ १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ‘स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया’ची घोषणा झाली तेव्हा लोकांनी त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. पण स्टार्टअप इंडिया काय आहे, हे आज त्यांच्या लक्षात आले आहे.’ मोदींनी या वेळी ‘ओयो रूम्स’चे संस्थापक रितेश यांचा उल्लेख केला.

अर्थसंकल्पात योग्य करप्रणालीची घोषणा : जेटली
तत्पूर्वी, अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, आगामी अर्थसंकल्पात स्टार्टअपला अनुकूल करप्रणालीची घोषणा करण्यात येईल. सरकार व्यवसायाभिमुख कर रचनेवर काम करत आहे. त्यादृष्टीने अधिसूचना जारी करण्यात येईल. ‘स्टँडअप इंडिया’ योजनेत बँका एससी-एसटी आणि महिला व्यावसायिकांना कर्ज देतील. त्याद्वारे दोन वर्षांत जवळपास तीन लाख नवे व्यावसायिक तयार होतील. मुद्रा योजनेत देशातील सर्वात कमकुवत २५% लोकसंख्येला लक्ष्य करण्यात आले आहे. चार-पाच महिन्यांत १.७३ कोटी व्यावसायिकांनी त्याचा फायदा घेतला आहे. ही योजना काही वर्षे सुरू राहील.

२१ वे शतक भारताचे : सॉफ्टबँक सीईओ
जपानच्या सॉफ्टबँकेचे संस्थापक आणि सीईओ मासायोशी सोन म्हणाले, ‘२१ वे शतक भारताचे आहे. देशातील ८० कोटी स्मार्ट लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. ते इंग्रजी बोलतात. मोठा देशांतर्गत बाजार असणाऱ्या निवडक देशांत भारताचा समावेश आहे.’ मासायोशी यांनी आतापर्यंत मेक माय ट्रिप, स्नॅपडील, हाउसिंग डॉट काॅम आणि ओयो रूम्समध्ये गुंतवणूक केली आहे. ते म्हणाले,‘आमच्या कंपनीने पुढील १० वर्षांत १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे, पण एक वर्षातच २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. व्यावसायिकाच्या डोळ्यात किती चमक आहे, ज्या क्षेत्रात हा व्यावसायिक काम करत आहे त्यात किती स्पर्धा आहे, हे मी गुंतवणूक करण्याआधी पाहतो.’ मासायोशी यांनी भारताच्या सौर योजनांमध्ये २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

स्टार्टअपसाठी कृती आराखडा असा...
- कामगार व पर्यावरणाशी संबंधित नऊ कायद्यांसाठी स्वप्रमाणनाची सुविधा.
- ३ वर्षांपर्यंत तपासणीतून सवलत, नफ्यावर तीन वर्षे प्राप्तिकर अाकारला जाणार नाही.
- स्टार्टअपसाठी १० हजार कोटींचा निधी उभारणार.
- चार वर्षांपर्यंत ५००-५०० कोटी रुपयांच्या क्रेडिट गॅरंटी फंडाची तरतूद.
- नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन.
- भारताला स्टार्टअप हब बनवण्याचे उद्दिष्ट, स्टार्टअप फेस्ट हाेणार.
- २४ तासांत स्टार्टअप सुरू करण्यासाठी पोर्टल, अॅप आधारित अर्जाची सुविधा.
- पेटंट प्रक्रिया सोपी होणार, पेटंट शुल्कात ८० टक्क्यांपर्यंत कपात.
- बौद्धिक संपदा आणि युवा संपदा एकत्रित आणण्याचा प्रयत्न.
- ९० दिवसांत व्यवसाय गुंडाळण्याच्या सुविधेसाठी विधेयक आणणार.
अर्थसंकल्पात करप्रणालीची घोषणा
अर्थसंकल्पात स्टार्टअपला अनुकूल करप्रणाली जाहीर केली जाईल. ‘स्टँडअप इंडिया’ योजनेत एससी-एसटी आणि महिला उद्याेजकांना कर्ज देऊ.
- अरुण जेटली, अर्थमंत्री