आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित 100 फायली जारी, वाचा 6 मोठे खुलासे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित १०० फायली जारी केल्या असल्या तरी त्यातून नेताजींबाबतच्या रहस्याचा उलगडा होईल की नाही याबाबत इतिहासकार व तज्ज्ञांत मतभेद आहेत. नेताजींच्या बेपत्ता होण्याच्या घटनेवर पुस्तक लिहिणारे अनुज धर म्हणाले, तशी तर प्रत्येकच फाईल महत्त्वाची आहे, पण गुप्तचर संस्थांच्या फायली सार्वजनिक होईपर्यंत रहस्याचा उलगडा होण्याची शक्यता कमी आहे. सरकारने आश्वासनानुसार दर महिन्याला २५ फायली सार्वजनिक केल्या तरच ते शक्य आहे.

नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला की नाही यावर बोस कुटुंबीयांमध्ये मतभेद आहेत. नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस म्हणाले, ‘लालबहादूर शास्त्री यांनी सुरेश बोस यांना पत्र लिहिले होते. विमान अपघाताचा कुठलाही ठोस पुरावा नाही, पण परिस्थितीजन्य साक्षींच्या आधारे नेताजींच्या मृत्यूची पुष्टी केली जाऊ शकते, असे या पत्रात म्हटले होते.’ मात्र, जर्मनीत राहत असलेल्या नेताजींची कन्या अनिता बोस म्हणाल्या, ‘तायपे विमान अपघातात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला की नाही याबाबत मला फारसा रस नाही. पण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या योगदानाला महत्त्व मिळावे.’दुसरीकडे, चंद्र बोस यांनी दावा केला की, ‘नेताजींची पत्नी आणि अनिता यांची आई एमिली शेंक मार्च १९९६ पर्यंत जिवंत होत्या. नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला नव्हता, असा विश्वास त्यांना होता. नेताजी १९४५ नंतरही रशियात जिवंत होते, असे त्यांना एका रशियन पत्रकाराने सांगितले होते.’नेताजींचे पुतणे शिशिरकुमार बोस यांच्या पत्नी कृष्णा म्हणाल्या, ‘प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघाताला दुजोरा दिला आहे. विमान अपघात झालाच नाही हे सिद्ध करू शकणारा कुठलाही पुरावा आमच्याकडे नाही. तसा पुरावा आला तर आम्ही त्यावर विचार करू.’
राष्ट्रपुरुषाचा दर्जा द्या
"देशाला नेताजींबाबत सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. आम्ही त्या सर्व फायली पाहू इच्छितो, ज्यांत नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य दडलेले आहे व त्यावर प्रकाश टाकला जाऊ शकेल. नेताजींबाबतचे सत्य पुराव्यांसह समोर आले पाहिजे. तसेच नेताजींना राष्ट्रपुरुषाचा दर्जा मिळाला पाहिजे. ते त्यास पात्र आहेत.'
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल
फायलींमधील नेताजींशी संबंधित ६ मोठे खुलासे
- नेहरूंनी नेताजींच्या पत्नी - मुलीच्या मदतीसाठी दोन लाख रु देत ट्रस्ट बनवला. त्याच्या व्याजातून १९६४ पर्यंत तिमाही १५०० रु दिले जात.
- लष्करासाठी नेताजी निधी संकलन मोहीम घेत. त्यांची सुवर्णतुला झाली होती. परंतु रंगूनहून परत येताना ही संपत्ती कुठे गेली ते समजलेच नाही.
- तेव्हा कोअर कमेटीने त्यांची रक्षा आणल्याने राजकीय लाभ होणार नाही . जन्मशताब्दीवेळी त्याचा विचार व्हावा, असे मत दिले होते.
- एका फाइलवर आयबीचे नोटिंग आहे. त्यात रशिया नेताजींना ब्रिटिश एजंट मानत होते, असा उल्लेख करण्यात आला होता.

- नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियाच्या रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या आहेत. त्यासाठी भारताने ५२ लाख रु. खर्च केले.
-१९४५मध्ये काँग्रेस अध्यक्ष मौलाना आझाद यांनी नेताजींना श्रद्धांजली वाहिली नव्हती. गांधीजी १९४६ मध्ये म्हणाले होते. बोस जिवंत आहेत.