आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी फ्रान्सला रवाना, पॅरिसमध्ये आज बोटीत चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी असे अभिवादन केले.)
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बोटीत बसून चर्चा करतील. युरोपच्या दौर्‍यावर रवाना झालेले मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्याशी अशी चर्चा करणार आहेत. यास परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी दुजोरा दिला आहे.

शुक्रवारी मोदी ओलांद यांच्यासमवेत क्रूझने पॅरिसच्या सीन नदीवर सफर करतील. व्यग्र कार्यक्रमापासून फारकत घेत हे काही निवांत क्षण असतील. त्यांची फ्रान्सची ही चार दिवसांची भेट असेल. या भेटीत ते आण्विक ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर चर्चाही करतील. त्याचबरोबर ते येथे असलेल्या युनेस्कोच्या मुख्यालय, फ्रेंच अंतराळ संस्था, एअरबस कार्यालयासही भेट देणार आहेत. मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात फ्रान्समधील कंपन्या सहभागी होतील, अशी भारताला अपेक्षा आहे. पहिल्या महायुद्धाच्या स्मृतिस्थळावर ते आदरांजली वाहतील. फ्रान्सच्या बाजूने लढताना १० हजार भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. दोन्ही देशांतील नाते त्यामुळेच दृढ मानले जाते. फ्रान्सनंतर ते जर्मनीला जातील, नंतर कॅनडाचा दौरा करतील. पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतरचा हा पहिलाच युरोप दौरा आहे.

३ देश ९ दिवस, आण्विक सहकार्य आणि ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य
फ्रान्समध्ये चार दिवस
- अर्थव्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्यावर उच्चस्तरीय नेत्यांमध्ये चर्चा.
- पहिल्या महायुद्धात प्राणांची आहुती देणार्‍या १० हजार भारतीयांना श्रद्धांजली, युनेस्को मुख्यालय, अंतराळ संस्थेला भेट.

जर्मनीमध्ये स्मार्ट सिटीवर चर्चा
- १२ एप्रिल रोजी पोहोचतील. स्मार्ट सिटी, सौर ऊर्जा, गंगा स्वच्छता आणि पायाभूत विकासावर चर्चा.
- भारत-जर्मनी सीईओ संमेलनाचे उद्घाटन. मर्केल यांना भारत भेटीचे निमंत्रण देतील.

कॅनडातून आणणार युरेनियम, १७ ला मायदेशी
- १५ एप्रिलला पोहोचतील. युरेनियम आयातीसाठी समझोता होण्याची अपेक्षा.
- जगातील सर्वात मोठ्या युरेनियम उत्पादक केमिआे काॅर्पोरेशनशी करार शक्य.

आपल्याला आण्विक तंत्रज्ञान, युरोपला बाजारपेठ
१६५० मेगावॉटची दोन आण्विक संयंत्रे महाराष्ट्रात; परंतु किंमत निश्चित नाही. आता करार जुळण्याची शक्यता.
१४ पट वाढवायचे आहे आपल्याला आण्विक ऊर्जेचे उत्पादन. २० वर्षांचे लक्ष्य. त्यासाठीच स्वस्त युरेनियमची अधिक गरज.
०५ वर्षांपासून सहमतीसाठी चर्चा सुरू, भारताचे आण्विक ऊर्जा महामंडळ आणि फ्रेंच यांच्यात सहमती नव्हती.

सिम्बॉलिझमवर जगाचे लक्ष राहणार
मोदी प्रतीकात्मकतेच्या कूटनीतीवर वाटचाल करत आहेत. प्रजासत्ताकदिनी आेबामा आले होते. त्या वेळी मोदी यांनी त्यांची विमानतळावर गळाभेट घेतली होती. त्यानंतर हैदराबाद हाऊसच्या लॉनवर आेबामा यांना आपल्या हाताने चहा पाजला होता. त्याकडे जगभरातील मीडियाने मोठे प्रतीकात्मक म्हटले होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत गुजरातच्या साबरमती आश्रमात फेरफटका मारला होता.