आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Gives Our Village, Our Development Announcement

ग्रामपंचायतींची ‘सरपंच-पती’ संस्कृती मोडीत काढा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ग्रामपंचायतींमधील ‘सरपंच-पती’ संस्कृती मोडून काढावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. त्यांनी ‘आपले गाव आपला विकास’ ही घोषणा देत पाच वर्षांत गावांचा कायापालट करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित परिषदेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, राजकीय समारंभात काही लोक स्वत:चा परिचय सरपंच-पती असा करून देतात. कायद्याने महिलांना काम करण्याचा अधिकार दिला आहे, त्यांना काम करू द्या. ‘सरपंच -पती’ संस्कृती बंद व्हायला हवी. महिलांनीही या संधीचा लाभ घ्यावा. मुले मध्येच शाळा सोडून जातात. हा प्रकार रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी महत्त्वाची भूमिका बजावायला हवी. ग्रामपंचायत सदस्यांनी अधिकाऱ्यांसोबत आठवड्यात एक दिवस गावातील शाळेत बसून गावाच्या विकासावर चर्चा करावी व ५ गरीब कुटुंबांना गरिबीपासून मुक्ती देण्याचा संकल्प सोडावा. त्यामुळे संपूर्ण देशात बदल घडेल. गावांचा वाढदिवस साजरा करावा, असा सल्ला देत मोदी म्हणाले, भारत खेड्यांत राहतो, असे महात्मा गांधी म्हणत असत.

गावांचा विकास कसा करावा यावर विचार करण्याची गरज आहे. गावांबाबत आपला दृष्टिकोन ‘गौरव’ आणि ‘सन्माना’चाच असावा. कोणत्याही गावात राहणारे लोक मोठी स्वप्नं पाहतात. आपण पुढील पाच वर्षांत गावांसाठी काय मिळवू शकतो यावर विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

बजेटने काही होणार नाही : पंतप्रधान म्हणाले की, फक्त बजेटमुळे गावांतील स्थिती बदलणार नाही. त्यासाठी ग्रामपंचायतींना भक्कम करावे लागेल. निधीची तरतूद केल्याने पक्के रस्ते बांधले जाऊ शकतात, पण नेतृत्व क्षमतेमुळे रस्त्याशेजारी झाडे लावून गावाला हरित करता येईल.

१० वर्षांनी बदल
केंद्र सरकार ग्रामपंचायतीच्या विकासासाठी दरवर्षी १५ लाख ते एक कोटी रुपये निधी देईल. महिलांसाठीच्या आरक्षणातील बदल सध्या पाच वर्षांनी होतो. तो १० वर्षांनी होईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.